Dhule News : मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी गोयल | पुढारी

Dhule News : मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी गोयल

धुळे ; पुढारी वृत्तसेवा– भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. धुळे जिल्ह्यात एकूण 17 लाख 27 हजार 475 मतदारांची संख्या झाली आहे. या मतदार यादीत तरुणांची तरुण मतदारांची संख्या तीन लाख 29 हजार इतकी असून यंदा ऐंशी वर्षांपुढील मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येण्याची नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणीची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मतदार यादी शुद्धीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या मतदार यादीत तरुणांची तरुण मतदारांची संख्या तीन लाख 29 हजार इतकी असून यंदा ऐंशी वर्षांपुढील मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येण्याची नियोजन असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात अंतिम मतदार यादी प्रसिद्धी निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  गोयल म्हणाले की, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर, 2023  च्या यादीत 39 हजार 216 नविन मतदार नोंदणी व स्थलांतरीत मतदार 4 हजार 773 असे एकूण 43 हजार 989 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 36 हजार 826 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम मतदारयादीमध्ये 7 हजार 163 मतदारांची वाढ होऊन धुळे जिल्ह्यात एकूण 17 लाख 27 हजार 475 मतदारांची संख्या झाली आहे.

या अंतिम मतदार यादीत पुरूष मतदारांची संख्या 8 लाख 91 हजार 98, महिला मतदारांची संख्या 8 लाख 36 हजार 332 तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या 45 असून एकूण मतदारांची संख्या 17 लाख 27 हजार 475 असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली.

तसेच एकसारखे फोटो असलेले 8 हजार 990 मतदारांचे फोटो समान असल्याने त्यांची वगळणी केली आहे. तर मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले 1 हजार 171 दुबार समान मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवुन तसेच पूर्ण तपासणी अंती कायदेशिररित्या करण्यात आली आहे. यामुळे नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन ती अधिक परिपूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व मतदार, राजकीय पक्ष यांनी ज्या मतदारांची या मोहिमेत नावे वगळण्यात आली असेल अशा मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आजच तपासणी करुन घ्यावे. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल  https://voters.eci.gov.in  या संकेतस्थळावर किंवा https://electoralsearch.eci.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदार यादीत तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहे का हे पहावे, यासोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरुन ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरुन आपला मताधिकार सुनिश्चित करावा. तसेच जे पात्र नागरिक 2024 या वर्षातील 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर या नमूद अर्हता दिनांकाला अठरा वर्ष पुर्ण करणार आहेत. ते त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करु शकतील. जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. नवमतदार व दुरुस्ती केलेल्या मतदारांचे मतदार ओळखपत्र पोस्टाद्वारे घरपोच वितरीत करण्यात येत आहे. मतदार यादीतील नाव कमी करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती मयत होणे, स्थलांतर करणे किंवा असलेल्या मतदाराचे नावावर हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्र. 7, ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाईकाचे नाव इत्यादी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे. तरी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी तसेच सर्व पात्र मतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.
दृष्टीक्षेपात मतदार यादी

18-19 वर्ष वयोगटातील मतदार संख्या- प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी वेळी 7 हजार 490 इतकी होती. ती आज रोजी 17 हजार 321 आहे. 20-29 वर्ष वयोगटातील मतदार संख्या- प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी वेळी 3 लाख 14 हजार 995 इतकी होती ती आज 3 लाख 29 हजार 656 अशी आहे. 80 वर्ष वयोगटावरील मतदार संख्या आज रोजी 49 हजार 497 आहे. जिल्ह्यात 8 हजार 693 दिव्यांग मतदार आहे. जिल्ह्यात एकूण 45 तृतीयपंथी व्यक्ती यांची 100 टक्के मतदार नोंदणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button