पुढारी ऑनलाईन डेस्क: उद्धव ठाकरेंनी सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंच्या अहंकारपणामुळेच राज्य मागे पडले. उद्धव ठाकरेंचे वागणं म्हणजे लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२३) माध्यमांशी संवाद साधला. (Eknath Shinde On Thackeray )
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचं, त्यांना अभिप्रेत सरकार कार्यरत आहे. दलित, महिला आणि वंचितांचा विकास करणे हाच बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेबांनी कायम विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्या याच विचारावर सरकारचे राज्याच्या विकासाचं काम सुरू आहे. या सरकारसोबत पीएम मोदी खंबीरपणे उभे आहेत, असा उल्लेख देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. (Eknath Shinde On Thackeray)
राम मंदिर उभा राहणं हे बाळासाहेबांचे देखील स्वप्न होतं. त्यांची देखील काल अयोध्येत स्वप्नपूर्ती झाली, याचे मला समाधान आहे. पण विरोधकांनी या सोहळ्यावर आणि रामावर टीका केली. यावरून ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असा आरोप देखील शिंदे यांनी ठाकरेंवर केला आहे. (Eknath Shinde On Thackeray)
रामाला विरोध करणाऱ्यांना रामाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. जो रामाचा नाही, तो कामाचा नाही (जो राम का नाही, ओ किसी काम का नही) अशी टीका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना रामाने सदबुद्धी देवो, अशी अपेक्षाही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.