जळगाव : ८३ लाखांचा गुटखा जप्त, फैजपूर पोलिसांची कारवाई | पुढारी

जळगाव : ८३ लाखांचा गुटखा जप्त, फैजपूर पोलिसांची कारवाई

जळगांव- जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. फैजपूर पोलिसांनी नुकताच 83 लाखांचा गुटखा दोन आयशर भरून जप्त केला. तर चौघांना अटक केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. जळगाव जिल्हा हा महाराष्ट्र गुजरात तसेच इतर जिल्ह्यांना लागून असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये अवैध मार्गाने गुटखा येतो.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की, बऱ्हाणपूरकडून गुटख्याची तस्करी होत आहे. या माहिती च्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, मयुद्दीन सय्यद, मोहन लोखंडे, गोकुळ तायडे, विकास सोनवणे, उमेश चौधरी, देविदास सूरदास, अरुण नमावते या पथकाने सापळा लावला. फैजपूर पासून जवळ असलेल्या आमोदा गावाजवळ हॉटेल कुंदन जवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सावदा कडून भुसावळ कडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच १९ सी वाय 93 64 व एम एच 0282 यांना थांबून तपासणी केला असता त्यामध्ये राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. या दोन्ही वाहनातून 83 लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा प्रतिबंधक गुटखा जप्त करण्यात आला तर 34 लाख रुपये किमतीचे दोन्ही आयशर वाहने देखील ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी गुटखा व ट्रक असा एकूण एक कोटी 17 लाख 6 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. तर ज्ञानेश्वर सुकलाल चौधरी राहणार चाळीसगाव जयेश सुभाष चांदेलकर राहणार जळगाव, राकेश अशोक सोनार मंगेश सुनील पाटील राहणार जळगाव यांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्यात येतो. मात्र राज्यामध्ये प्रतिबंधक असलेला गुटखा जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री करण्यात येतो आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय बाहेरच खुलेआम गुटखा विक्री होते तसेच प्रत्येक तालुक्याच्या बसस्थानका बाहेर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. या गुटखा विक्री करणाऱ्या मोरक्याला एलसीबी किंवा जळगाव पोलीस बेड्या ठोकण्यात अपयशी ठरलेले आहे.

Back to top button