National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक सज्ज | पुढारी

National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पुण्यानंतर नाशिकला मान प्राप्त झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि. १२ ते १६ जानेवारी दरम्यान महोत्सवाचा २७ वा अध्याय नाशिकमध्ये रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोहळ्याचे उद‌्घाटन होणार असून, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत. (National Youth Festival)

देशातील प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीची प्रेरणा देण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. देशाच्या सर्व भागांतील विविध संस्कृतींना समान व्यासपीठावर एकत्रित करण्यात येते तसेच महोत्सवात सहभागींना एक भारत, सर्वोत्तम भारत या भावनेने जोडता येते. देशाच्या कानाकोपऱ्यातून कलाकार येथे येणार असून, त्यांची कला पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

या महोत्सवात 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांमधील युवा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परीक्षक व इतर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी असे साधारण आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या आहेत. (National Youth Festival)

शहरातील 10 ठिकाणी कार्यक्रम

शहरातील साधारण 10 ठिकाणी या महोत्सवातील विविध कार्यक्रम होणार आहेत. यामधील उद्घाटनाचा महत्त्वाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, हा मुख्य समारंभ तपोवन मैदानावरील १६ एकर जागेत होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवातील स्पर्धा व सांस्कृतिक सादरीकरण शहरातील उदोजी महाराज म्युझियम, कालिदास कलामंदिर, रावसाहेब थोरात हॉल, हनुमाननगर, अंजनेरी, केटीएचएम बोटक्लब, चामरलेणी, विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहेत.

पोलिस विभाग अलर्ट

महोत्सवासाठी शहर पोलिस दलाने बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे. शहरात सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून, त्यासाठी राज्यभरातून पोलिस दाखल होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने शहर व जिल्हा पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा यंत्रणांशी समन्वय ठेवत बंदोबस्ताची आखणी करण्यात येत आहे. शहरातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा, दहशतवादी विरोधी कक्ष, राज्य गुप्तवार्ता, राज्य गुन्हे अन्वेषण यासह सर्व अलर्ट झाले आहेत. अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत.

शहर सजले…

महोत्सवानिमित्त देशभरात नाशिकला स्वत:चे ब्रॅण्डिंग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून जय्यत तयारी केली जात आहे. महापालिकेतर्फे शहरभरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, मोकळे भूखंड, क्रीडांगणे, नाले व नदीकिनारे इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसोबत सहाही विभागांतील वाहतूक बेट, रस्त्यांमधील दुभाजक व फुटपाथची स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. (National Youth Festival)

हेही वाचा :

Back to top button