पीक राखण्यासाठी आता लेसर बुजगावणे!

पीक राखण्यासाठी आता लेसर बुजगावणे!

नवी दिल्ली : शेतकर्‍यांना शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना बुजगावणे लावावेच लागते. पण फक्त बुजगावण्यावर अवलंबून राहूनही अजिबात चालत नाही. कारण यानंतरही निम्मे अधिक पीक फस्त होण्याचीच शक्यता अधिक असते. आता संशोधकांनी या समस्येवर मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला असून लेसर बुजगावण्याचा नवा पर्याय त्यांनी उपलब्ध करून देण्यावर विचार सुरू केला आहे.

उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान पक्ष्यांकडून होते, हे सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर, जवळपास 24 तास पिकांचे संरक्षण करणे भाग असते. पुरातन काळापासून यावर एकच मार्ग राहिला आहे, तो म्हणजे बुजगावण्यांचा. त्यावर मर्यादा होत्या आणि नुकसान थांबत नव्हते. यावर मार्ग काढत आता संशोधकांनी लेसर बुजगावण्याचा हायटेक उपाय शोधून काढला आहे. पेस्ट मॅनेजमेंट सायन्समध्ये यावर एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

संशोधकांनी लेसर बुजगावणे तैनात करत त्याची चाचणी घेतली आणि यात असे अधोरेखित झाले की हे लेसर बुजगावणे 20 मीटर्सपर्यंत पिकांचे अतिशय उत्तम रक्षण करतात. यामुळे आता शेतकरी देखील असे स्वस्त व पोर्टेबल लेसर उपकरण उपलब्ध व्हावे, या प्रतीक्षेत आहेत.

संशोधकांचा असाही दावा आहे की, केवळ 300 ते 500 डॉलर्समध्ये शेतकरी 3 आठवड्यांपर्यंत आपल्या पिकांचे उत्तम रक्षण करू शकतील. या लेसरचा फार काळ उपयोग करण्याची आवश्यकता नाही, असे आढळून आले आहे. या लेसर बुजगावण्यांमुळे पर्यावरणाचा लाभ होईल आणि अन्य वन्य जीवांना देखील नुकसान होणार नाही, असा संशोधकांचा दावा आहे. एरव्ही शेतकरी यावर मार्ग काढण्यासाठी फटाके, धमाका करू शकेल, अशी बंदूक वापरात आणतात. पण त्याचे तोटे अधिक असतात आणि प्रदूषणात वाढ हे त्यात ओघानेच येते. येत्या काही महिन्यांमध्ये लेसर बुजगावण्यांचा हा पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, असे सध्याचे संकेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news