Nashik Leopard : रामेश्वर नगरला बिबट्याचे दर्शन, सीसीटीव्हीत दृश्य कैद | पुढारी

Nashik Leopard : रामेश्वर नगरला बिबट्याचे दर्शन, सीसीटीव्हीत दृश्य कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोडवरील रामेश्वर नगर, सीरिन मीडोज परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बुधवारी (दि.१३) सकाळी सातच्या सुमारास बिबट्या मुक्त वावर करताना आढळून आला. बिबट्याचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून प्रत्यक्षदर्शी एकच व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र बिबट्याचे पुन्हा अस्तित्व न दिसल्याने तो त्याच्या मुळ अधिवासात गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

बुधवारी सीरिन मीडोज, रामेश्वर नगर, पाइपलाइन रोड भागात सकाळी सातच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार वनविभागास ही माहिती दिली व घटनास्थळी धाव घेतली. वन परिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वन परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनपाल उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, रोहिणी पाटील यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले आणि ‘इको-एको फाउंडेशनचे’ बचाव पथकही दाखल झाले. परिसरात बिबट्याचा शोध घेतला मात्र तो दिसला नाही. बिबट्यास प्रत्यक्ष फक्त श्रवणम् इमारतीच्या सुरक्षारक्षकाने बघितल्याचा दावा केला जात आहे. बिबट्याने गेटला धडक दिल्यावर सुरक्षारक्षक खोलीत लपला. बचाव पथकाने गेटवरील बिबट्याच्या केसांसह पाऊलखुणा ओळखून माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या न दिसल्याने तो निघून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच रामेश्वर नगरच्या उद्यानाजवळील मोकळ्या जागेत झुडपे असल्याने तिथे फटाके फोडण्यात आले. मात्र तेथेही बिबट्याचे अस्तित्व दिसले नाही.

गेटला दिली धडक

सकाळी साडेसहा वाजता गंगापूररोड भागातील सीरिन मीडोज परिसरातील श्रवणम् इमारतीच्या गेटला बिबट्याने धडक दिली. धडक दिल्याने गेटवर बिबट्याचे केस लागले. त्यानुसार बचाव पथकाने बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शी एक व्यक्तीच्या दाव्यानुसार बिबट्याचा माग काढता आला नाही. त्यामुळे सकाळच्या सुमारास बिबट्या पुन्हा त्याच्या मुळ अधिवासात परतल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

वन्यजीव बचाव पथकास परिसरात तैनात ठेवले आहे. रात्र गस्त वाढविण्यात आली आहे. बिबट्या दिसल्यास त्वरित माहिती कळवावी. मात्र, अफवा पसवू नयेत. तसेच यापूर्वीचे व्हिडिओ, फोटो व्हायरल करुन नागरिकांना भयभीत करु नये.

– वृषाली गाडे, वन परिक्षेत्र अधिकारी

हेही वाचा :

Back to top button