Pimpri News : महावितरणची हेल्पलाईन ठरतेय हेल्पलेस | पुढारी

Pimpri News : महावितरणची हेल्पलाईन ठरतेय हेल्पलेस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात वीजपुरवठा सतत खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या वतीने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत; मात्र नागरिकांनी तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा हेल्पलेस असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. औद्योगिक आणि शैक्षणिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठ मोठे उद्योग सुरू झाले तर अनेक आयटी कंपन्या शहरात सुरू झाल्याने शहराची ओळख आता आयटी शहर म्हणूनही होत आहे.

त्यामुळे रोजगारासह शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून नागरिक शहरात वास्तव्यास आले आहेत.
परिणामी मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येच्यादृष्टीने त्यांना पालिका तसेच वीज वितरणकडून सुविधा पुरविणे ही गरजेचे आहे. परंतु सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत तक्रारीसांठी महावितरणच्या वतीने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरून मदत मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

हेल्पलाईन क्रमांक शोभेचे

वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना 24 तास सेवा मिळावी यासाठी 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे; मात्र या क्रमांकावर संपर्क साधल्यास कारवाई कधी होईल, याची नागरिक वाट पाहतात. परंतु कारवाईच्या नावाने बोंब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पिंपरी कॅम्प हेल्पलाईन क्रमांकावर मिळेना प्रतिसाद

महावितरणच्या वतीने पिंपरी कॅम्पासाठी 7875779559 या हेल्पलाईन क्रमांकांची सोय केली आहे. मात्र संपर्क साधला असता,कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा

Back to top button