हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा | पुढारी

हिरे बंधुविरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संस्थेत नोकरी देण्याचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक करणे, बोगस शिक्षक – लिपीक भरती प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता हिरे कुटूंबियांविरोधात फसवणूक करून निती आयोगाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे पदाधिकारी, संचालक व दहा शाळांच्या तत्कालीन मुख्याध्यापकांनी संगनमत करून निती आयोगाकडील १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी उदय विठ्ठलराव देवरे यांच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात संस्थेचे पदाधिकारी अद्वय प्रशांत हिरे, डॉ. अपुर्व प्रशांत हिरे यांच्यासह इतर पदाधिकारी व संचालक मंडळांसह १० शाळांच्या तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. देवरे यांच्या फिर्यादीनुसार, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या अंतर्गत असलेल्या दहा शाळांनी अटल टिंकरींग लॅब स्थापन करण्यासाठी अर्ज केले व त्यासाठी असलेल्या नियमांची पुर्तता केल्याचे चुकीची कागदपत्रे जमा केले. त्यानंतर निती आयोगाकडून संबंधित शाळांना १ कोटी ५६ लाख रुपये निधी मिळाला. दरम्यान, या शाळांची चाैकशी केल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यामुळे देवरे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात हिरे बंधुसह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व शाळांचे तत्कालीन मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादा भुसेंच्या आदेशानंतर कारवाई

देवरे यांच्या फिर्यादीनुसार, पालकमंत्री दादा भुसे यांनी १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रानुसार, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांनी हिरे यांच्या दहा शाळांना प्रत्यक्ष भेटी देत तपासणी केली. त्यातून हा गैरव्यवहार समोर आला.

अशी आहे एटीएल लॅब योजना

केंद्र सरकारच्या अटल इनोवेशन मिशन उपक्रमांतंर्गत विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन वाढावा यासाठी निती आयोगामार्फत शासनाच्या अटी शर्थी पुर्ण करणाऱ्या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटीएल लॅब) स्थापन केल्या आहेत. या लॅब सुरु करण्यासाठी शाळेत किमान १५०० हजार चौरस फुट बांधकाम व किमान दीड हजार विद्यार्थी असणे आवश्यक आहे. या नियमांची पुर्तता केल्यास संबंधित शाळांना निती आयोगाकडून भांडवली खर्चासाठी १० लाख रुपये व देखभाल दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये अनुदान दिले जाते.

चाैकशी समितीला आढळलेल्या त्रुटी

मिळालेल्या निधीचा कोणताही ताळमेळ आढळला नाही. मुख्याध्यापकांनी निती आयोगाच्या संकेतस्थळावर चुकीची माहिती भरून लॅब मंजूर करून घेतल्या. शाळांमध्ये किमान १५०० विद्यार्थी व १५०० चौरस फुट आकाराची प्रयोगशाळा नव्हती. निती आयोगाकडून प्राप्त निधीच्या हिशोबाची रोखवही नव्हती. तसेच लॅबसाठी मिळालेल्या वस्तू-साहित्यांची नोंद असलेली नोंदवही देखील नव्हती. निधी फक्त संस्था व मुख्याध्यापकांच्या संयुक्त बँक खात्यात घेण्याचे निधी आयोगाचे आदेश आहेत. मात्र संस्थेने १० मार्च २०१९ रोजी कार्यकारीणीच्या बैठकीत ठराव करून फक्त मुख्याध्यापकांच्या नावे बँक खाते उघडले. त्यामुळे निती आयोगाच्या अटी शर्थींचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले. चौकशी समितीने शाळांच्या मुख्याध्यापकांकडे लॅबची कागदपत्रे मागितली. त्यावेळी कागदपत्रे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात जमा असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले होते. मात्र ही कागदपत्रे संस्थेला ठेवण्याचे अधिकार नाही. त्यामुळे लॅबसाठी मिळालेले अनुदान लॅबवर खर्च न होता त्याचा लाभ विद्यार्थ्यांना न होता त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे नुकसान झाल्याचे चौकशी समितीने सांगितले आहे.

या शाळांच्या नावे घेतला निधी

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुंगसे येथील के. बी. एच. विद्यालय, कळवाडी येथील व्ही. बी. एच. विद्यालय, शेरुळ येथील के. बी. एच. विद्यालय व मालेगाव कॅम्प येथील के. बी. एच. विद्यालय या शाळांच्या नावे प्रत्येकी १६ लाख रुपयांचा निधी घेतला. तर आदिवासी सेवा समिती संचलित वडाळा येथील के. बी. एच. विद्यालय, सिडकोतील एल. व्ही. एच. विद्यालय, पंचवटीतील नर्सिस दत्त विद्यालय, पवननगर येथील के. बी. एच. विद्यालय या शाळांनी प्रत्येकी १६ लाख रुपये व गंगापूर रोड येथील के. बी. एच. विद्यालयाने १२ लाख रुपयांचा निधी घेतला.

उपनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हातील तक्रारदार व आरोपींना मी व्यक्तिशः ओळखत नसुन कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. या प्रकरणाची पुर्ण माहिती घेऊन मी सविस्तर बोलू शकेल, यामध्ये मला विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच माझी बदनामी करुन खोटे गुन्हे नोंदवून राजकीय हेतू साध्य करण्याचे कारस्थान सुरू आहे.

डॉ. अपुर्व हिरे, समन्वयक, महात्मा गांधी विद्यामंदिर


हेही वाचा :

Back to top button