नाशिक : शिक्षकदिनी मुख्याध्यापकच झिंगाट, धागुर शाळेतील प्रकार | पुढारी

नाशिक : शिक्षकदिनी मुख्याध्यापकच झिंगाट, धागुर शाळेतील प्रकार

दिंडोरी ; (जि. नाशिक)पुढारी वृत्तसेवा 

दिंडोरी तालुक्यातील जुने धागूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्याध्यापक दारू पिऊन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून, मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली जात आहे. अक्षरश: झिंगत आलेल्या या मुख्याध्यापकाला धड चालताही येत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी  या मुख्याध्यापकाचा भांडाफोड केला. संपूर्ण गाव गोळा झाल्याने या मुख्याध्यापकाने लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून पळ काढला. या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

योगेश गायकवाड असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते दिंडोरी तालुक्यातील धागुर जुने येथील जिल्हा परिषद शाळेत हे महाशय मुख्याध्यापक आहेत तसेच इयत्ता तिसरी आणि चौथीच्या वर्गांनाही ते शिकवतात. मंगळवारी सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जात असतांना हे महाशय सकाळी शाळेत येतांना ‘फुल टू’ होऊन आले. झिंगत झिंगत आलेल्या या मुख्याध्यापकाने आपल्या दालनात जात नशेतच कामकाजालाही सुरूवात केली. गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शाळेत जात या मुख्याध्यापकांना या वागणूकीचा जाब विचारला. केंद्र प्रमुखांनाही तक्रार करण्यात आली; मात्र यापूर्वी या मुख्याध्यापकांना वारंवार ताकीद देऊनही असले प्रकार सुरूच असल्याचे सांगत केंद्रप्रमुख ठाकरे यांनी हतबलत दर्शवली. सदरचा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मुख्याध्यापकाने गावकऱ्यांची माफी मागत शाळेतून धूम ठोकली.

दारु कालच प्यालो; आज नाही

मी आज दारू प्यालो नाही. रात्रीच मी दारू प्यालो होतो. माझ्या वर्गातल्या मुलांना वाचता येते, पाढेही पाठ आहे. आता जाऊ द्या मला माफ करा. मी माफी मागतो.

-योगेश गायकवाड, मुख्याध्यापक

जिल्हा परिषद शाळेची अब्रु वेशीवर

एकीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या शिक्षणबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे यापैकीच ‘सुपर १००’ हा एक उपक्रम. मात्र विद्यार्थी घडवतांना शाळेचे मुख्याध्यापकच असे दारू पिऊन शाळेत येणार असतील तर विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यायचा तरी कोणाचा. या प्रकारावरूनच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार उघड झाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेवर मित्तल यांचा वचक नसल्याचेच यावरून दिसून आले. कैलास कोळी, ग्रामस्थ, जुने धागुर

ग्रामस्थांनी सदर घटनेबाबत आम्हाला फोन केल्यानंतर मी केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना संबंधित शाळेवर तत्काळ पाठवले असता मुख्याध्यापक योगेश गायकवाड हे शाळेतून निघून गेले होते. ते आज देखील शाळेत आलेले नाहीत याबाबतचा अहवाल मी चौकशी करून शिक्षणाधिकारी यांना पाठवला आहे.

चंद्रकांत गवळी प्र. गटशिक्षणाधिकारी, दिंडोरी

हेही वाचा :

Back to top button