नॅकमुळे संलग्नता काढलेल्या महाविद्यालयांची यादी पाठवा | पुढारी

नॅकमुळे संलग्नता काढलेल्या महाविद्यालयांची यादी पाठवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यापीठांशी संलग्न ज्या महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेले नाही अशा महाविद्यालयांची यादी उच्च शिक्षण संचालनालयाला कळवावी, असे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या प्रारंभ दिनांकापर्यंत नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या होत्या. ज्या महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही अशा महाविद्यालयांबाबत संलग्नता काढून घेण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागाने सर्व विद्यापीठांकडून मागविला होता.

पण, अजूनही काही विद्यापीठांनी अहवाल पाठविलेला नाही, तर काही विद्यापीठांनी केवळ कार्यवाही चालू आहे, असे कळविले आहे. त्यामुळे विद्यापीठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने डॉ. देवळाणकर यांनी पुन्हा सर्व विद्यापीठांना कार्यवाहीबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत पाठविण्यास सांगितले आहे.

संचालनालयाने 23 मे व 9 ऑगस्ट रोजी सर्व विद्यापीठांना नॅक मूल्यांकनाबाबत कळविले होते. पण, काही विद्यापीठांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत डॉ. देवळाणकर यांनी पुन्हा सर्व विद्यापीठांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 110 मधील पोटकलम (4) मध्ये नमूद तरतुदीनुसार, आपल्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील ज्या महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन केले नाही अशा महाविद्यालयांबाबत महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठांनी महाविद्यालयांसंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत संचालनालयाने कळविले होते.

अद्यापही काही विद्यापीठांकडून कार्यवाहीचा अहवाल अप्राप्त आहे. तसेच ज्या विद्यापीठांनी अहवाल सादर केला आहे, त्यामधील काहींनी केवळ कार्यवाही चालू असून, लवकरच अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. याबाबत कार्यवाहीची वस्तुनिष्ठ माहिती नमूद करावी. महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठांनी त्या महाविद्यालयांच्या नावाच्या यादीसह केलेली कार्यवाही नमूद करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास अपेक्षित आहे.

हेही वाचा

पुणे : दिवे घाटात आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह; खून केल्याचे तपासात उघड

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर

Back to top button