धुळ्यात आमदार कुणाल पाटील यांचे शेतकरी आक्रोश आंदोलन | पुढारी

धुळ्यात आमदार कुणाल पाटील यांचे शेतकरी आक्रोश आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

येत्या दोन दिवसात धुळे जिल्हयातील शेतकर्‍यांना पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्याचा निणर्य जाहीर करावा. तसेच धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा, अन्यथा सरकारला शेतकर्‍यांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा अंतिम इशारा आ. कुणाल पाटील यांनी दिला आहे. तर शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आ.पाटील यांनी ठणकावले.

आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालीधुळे जिल्हा काँग्रेसच्यावतीने धुळ्यातील क्यूमाईन क्लबजवळ आज आक्रोश आंदोलन झाले. आंदोलनात जिल्हयातील शेतकरी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना आमच्यावर अन्याय होत असल्याच्या व्यथा शेतकर्‍यांनी मांडल्या.

धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम मंजुर करुन तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करावी तसेच धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा या मागणीसह दुष्काळातील उपाययोजना करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील शेतकर्‍यांचे शेतकरी आक्रोश आंदोलन करण्यात आले. धुळे ग्रामीण व धुळे जिल्हा काँग्रेसच्यावतीने धुळ्यातील क्यूमाईन क्लबजवळ आज आक्रोश आंदोलन झाले. यावेळी आंदोलनात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सरकारवर चांगलाच घणाघात केला. आ.पाटील म्हणाले कि, जिल्ह्यात दुष्काळ असतांना अजूनही शेतकर्‍यांना पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्याचे जाहिर करीत नाही. तर दुसरीकडे कृषीमंत्र्यांच्या बीड जिल्हयात अग्रीम रक्कम देवून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. शेतकरी दुष्काळाच्या भयान संकटात सापडला असतांना पालकमंत्र्यांनी पाठ फिरविली आहे. म्हणून आता सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. येत्या दोन दिवसात पिक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय जाहिर करावा तसेच धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा अन्यथा सरकारला शेतकर्‍यांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेले असा इशारा आ.कुणाल पाटील यांनी यावेळी दिला.

आंदोलनस्थळावरून आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आ.पाटील यांनी दुष्काळी परिस्थीतीबाबत जिल्हाधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली.

या आहेत मागण्या

आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनात दुष्काळाबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यात खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार शेतकर्‍यांना पिक विम्याची 25टक्के अग्रीम रक्कम तातडीने द्यावी,धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा,शेतकर्‍यांना दुष्काळी अनुदान द्यावे,शेतकर्‍यांना कर्जमुक्त करावे,कृषीपंपाचे विज बिल माफ करावे,चारा छावण्या सुरु कराव्यात,विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे,शेतसारा माफ करावा,रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, शेतकर्‍यांना सिंचन विहीरी मंजुर कराव्यात,शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत करावा अशा विविध मागण्या यावेळी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्या.आंदोलनात आ.कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,प्रदेश सचिव युवराज करनकाळ,शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,माजी सभापती गुलाबराव कोतेकर, ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, संचालक साहेबराव खैरनार, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील,कृऊबा उपसभापती योगेश पाटील,कृषीभूषण भिका पाटील,माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, जि.प.सदस्य अरुण पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल यांच्यासह धुळे तालुका,शिंदखेडा,शिरपुर, साक्री तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

अक्कलपाड्याचे पाणी द्या-

जिल्हाधिकार्‍यांशी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यात दुष्काळ असून सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, छोटे मोठे तलाव कोरडे ठाक पडले आहेत.त्यामुळे अक्कलपाड्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतकर्‍यांना तसेच पिण्यासाठी पाणी द्यावे अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

शेती पंपाला सुरळीत विज द्यावी-

सध्या दररोज अतिरिक्त भारनियमन करुन शेतकर्‍यांना फक्त दोन ते तीन तासच वीज पुरवठा केला जात आहे. तोही वारंवार खंडीत होत असून कमी दाबाने दिला जात आहे. त्यामुळे दुष्काळात सापडलेले पिक पुन्हा विजेअभावी करपू लागले आहे. म्हणून शेतीपंपाचे भारनियमन थांबवून पूर्ण क्षमतेने विज पुरवठा करण्याची मागणी आ.कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

शेतकर्‍यांनी मांडल्या व्यथा-

आ.कुणाल पाटील यांच्यासोबत जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेल्या शेतकर्‍यांनी दुष्काळाच्या व्यथा मांडल्या. सन 1972च्या दुष्काळापेक्षाही भयानक दुष्काळ यावर्षी आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी कर्जाने हतबल झाला आहे. त्यामुळे तत्काळ दुष्काळ जाहिर करुन उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडतांना केली.

युध्दपातळीवर काम सुरु-जिल्हाधिकारी

आ.कुणाल पाटील यांच्याशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले कि, दुष्काळी परिस्थीतीवर युध्दपातळीवर काम सुरु आहे. दररोज विविध विभागाच्या बैठका घेवून अहवाल मागविण्याचे काम सुरु आहे. आक्रोश आंदोलनातून मांडलेल्या मागण्यावर तत्काळ अहवाल मागवून निर्णय घेवू. तसेच वीजेचे भारनियमन आणि शेतीपंपाच्या विजपूरवठाबाबतच्या तक्रारींवर लगेच वीज वितरण विभागाची बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

Back to top button