धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन | पुढारी

धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यात पाणी प्रश्न पेटला असून आज साक्री रोड परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडा बजाव आंदोलन करून महापालिकेतील सत्ताधारी गट आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या विरोधात मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महापालिकेतील सत्ताधारी गटाला निवेदन देण्याच्या मागणीसाठी यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.

धुळे महानगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून आज संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर खरात, सामाजिक कार्यकर्त्या पुनम शिरसाठ, रिपाईच्या नैना दामोदर, अनिल ठाकूर, रोहित सोनवणे, विकी लोंढे, अमोल शिरसाठ, निलेश जिरे, संगीता पाटील आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

या आंदोलकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मडके फोडून व हंडे वाजवून निषेध व्यक्त केला. यानंतर प्रशासनासमोर आपली बाजू मांडण्यासाठी आंदोलक महानगरपालिकेच्या गेट जवळ आले असता पोलिसांनी गेट बंद केले. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. यानंतर आंदोलकांमधून केवळ पाच जणांना आयुक्त देविदास टेकाळे यांची भेट घेण्यासाठी पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आले. आयुक्त टेकाळे यांच्या दालनात सहायक आयुक्त विजय सनेर, तसेच उपायुक्त चंद्रकांत ओगले यांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलकांमधून आनंद लोंढे यांनी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्या संदर्भात नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेतील सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सलग एक दिवसाआड पाणी देण्याच्या खोटी आश्वासने दिली जात आहेत. मुळात पाणी योजनेत भ्रष्टाचाराचे पाणी मुरलेले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार लपवण्यासाठी पाणी देण्याच्या आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचे काम केल जाते आहे. नवीन पाणी योजनेचे काम दर्जाहीन झाले असून व्हॉल्व कुठे लावलेले आहेत याचा ताळमेळ नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या कामात सत्ताधारी आणि प्रशासनात समन्वय नाही. तसेच प्रशासन विस्कळीत पाणीपुरवठ्याची खरी परिस्थिती जनतेसमोर मांडत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे फावते आहे. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनावर भोळी भाबडी जनता आस लावून बसली असून पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. सध्या धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकान, हरण माळ तलाव तसेच तापी पाणी योजनेत देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठा असून देखील जनतेला पाणी मिळत नाही. त्यामुळेच हंडा बजाव आंदोलन केले असल्याचा यावेळी स्पष्ट करण्यात आले. विशेषतः जनतेचे आंदोलन होऊ नये ,यासाठी आंदोलकांनी लावलेले बॅनर पोलिसांच्या मदतीने फाडून टाकण्यात आले, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

विज आणि जलवाहिनीची गळती ही समस्या-आयुक्त टेकाळे

या संदर्भात माहिती देताना आयुक्त देविदास टेकाळे आणि सहाय्यक आयुक्त विजय सनेर यांनी सांगितले की, सध्या तापी योजना इथूनच शहराला पाणीपुरवठा केला जात असून यात वीज ही मोठी समस्या आहे. त्याचप्रमाणे तापी योजना जुनी झाली असल्यामुळे गळती सुरू झाल्यास पाणीपुरवठा थांबवावा लागतो. त्यामुळेच पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे. अक्कलपाडा योजनेचे 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. 33 केव्हीच्या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. धुळे शहराला सध्या 120 एम एल टी पाण्याची आवश्यकता असून सध्या केवळ 55 एम एल टी पाणी मिळते आहे. 60 एम एल टी पाण्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महानगरपालिकेला अक्कलपाडा योजनेची मदत होणार आहे. तोपर्यंत आहे त्या पाणीसाठ्याच्या आधारावर जनतेला वेळेवर पाणी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विभागवार जलकुंभाच्या सफाई तसेच अन्य नियोजनाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्त टेकाळे यांनी यावेळी दिले. वीज वितरण कंपनीला देखील लेखी सूचना देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button