पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताची विकासाकडे घोडदौड सुरु : खासदार सुभाष भामरे | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताची विकासाकडे घोडदौड सुरु : खासदार सुभाष भामरे

धुळे, पुढारी वृत्तसेवा : भारतातील ईशान्येकडील राज्यांच्या प्रश्नावरून चीनला भारताने सज्जड इशारा यापूर्वी दिलेला आहे. भारत हा आता १९६२ चा देश राहिलेला नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारत हा सक्षम असल्याचा संदेश चीनला दिला आहे. याबरोबरच सर्वच क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केली असल्याची माहिती आज माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी खासदार सुभाष भामरे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राघवेंद्र पाटील, राम भदाणे तसेच किशोर सिंगवी, भाऊसाहेब देसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सुभाष भामरे म्हणाले, २०१४ पूर्वी जम्मू काश्मीर भागात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. पुलवामा आणि कारगिल सारख्या घटनांमुळे दहशतवाद्यांनी त्रास देणे सुरू ठेवले होते .मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर आल्यानंतर त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. याबरोबरच आज सर्वच क्षेत्रांमध्ये भारताने गेल्या नऊ वर्षात विकासाची घोडदौड सुरू ठेवली आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या लाभ हा थेट जनतेच्या खात्यात जावा, यासाठी ३७ कोटी जनधन खाते काढले गेले. यापूर्वी शासनाच्या अनुदानाच्या पैशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. मात्र जनधन खाते योजनांमुळे हा भ्रष्टाचार थांबला. प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत जनतेला दोन लाखाच्या सुरक्षा कवच मिळाले .तर जीवन सुरक्षा व अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून देखील जनतेला मदतीचा हात मिळाला, असेही सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button