World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका, तीन ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा पुरस्कार | पुढारी

World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका, तीन ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा पुरस्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

माझी वसुंधरा योजनेमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील शासकीय कार्यक्रमात सन्मान होणार आहे. जिल्हा परिषदेसह शिरसाटे (ता. इगतपुरी), विंचूर (ता. निफाड) आणि शिंदे (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा समावेश केला होता. योजनेचे निकष पूर्ण करताना गुणानुक्रमाद्वारे या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कार्य करत पर्यावरण संरक्षणाचे कार्य केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा गौरव होणार आहे. यामधील शिरसाटे ग्रामपंचायतीने यापूर्वीही पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवित राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविला होता. तसेच विंचूर आणि शिंदे ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक उपक्रम आणि जनजागृती करत पुरस्कारावर नाव कोरले आहे. (World Environment Day)

माझी वसुंधरा ३.० मध्ये ० ते २५०० लोकसंख्या, २५०० ते ५००० लोकसंख्या, ५००० ते १०००० लोकसंख्या आणि १० हजारांवरील लोकसंख्या असलेली गावे अशी विभागणी केली आहे. यामध्ये ० ते २५०० लोकसंख्या गटात इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे, ५ हजार ते १० हजार लोकसंख्या गटात नाशिक तालुक्यातील शिंदे, तर १० हजारांवरील लोकसंख्या या गटात निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपंचायतीने बाजी मारली, तर उत्कृष्ट नियोजन म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात येणार आहे.

यांचा होणार सन्मान

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल तसेच शिंदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुरेश भोजने, शिरसाठे ग्रामपंचातीचे सरपंच गोकुळ सदगीर, शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव, विंचूरचे ग्रामविकास अधिकारी ग्यानदेव खैरनार यांचा गौरव होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button