नाशिक जिल्हा नवखेळाडूंची जन्मभूमी; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खासदार चषकाचे बक्षीस वितरण | पुढारी

नाशिक जिल्हा नवखेळाडूंची जन्मभूमी; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खासदार चषकाचे बक्षीस वितरण

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याच्या मातीत नेहमीच वेगळेपण दिसून येते आणि ते आजवर टिकून आहे. या जिल्ह्यातील अनेकांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत केवळ देशात नव्हे, तर जगात नाव कमावले आहे. भविष्यात जिल्ह्याच्या मातीतून उत्कृष्ट खेळाडू तयार होऊन ते देशाचा नावलौकिक सातासमुद्रापार नेतील, असा आशावाद मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.

येथील श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रांगणात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून आयोजित ‘खासदार चषक २०२३’ चा समारोप व बक्षीस वितरणाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ना. डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, नेमिनाथ संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजित सुराणा, जवाहरलाल आबड, मोहन शर्मा, अशोक व्यवहारे, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, शांताराम भवर, प्रशांत ठाकरे, विशाल व्यवहारे, मुकेश आहेर आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी खासदार चषकाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुला-मुलींच्या संघांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत उत्कृष्ट खेळ केला. यामुळे या चषकाच्या आयोजनामागील हेतू साध्य झाला असून, विजयी खेळाडूंचे अभिनंदन. मात्र जे हरले त्यांनी खचून न जाता आपण का हरलो, याची कारणे शोधून जिंकण्याची जिद्द उराशी बाळगल्यास तुमचा विजय नक्कीच होईल. यासाठी ध्येयवादी राहण्याचे आवाहन ना. डॉ. पवार यांनी केले. याप्रसंगी बेबिलाल संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय पाचोरकर, योगेश साळुंके, वाल्मीक वानखेडे, राजेश गांगुर्डे, डॉ. नितीन गांगुर्डे, गीता झाल्टे, अमर मापारी, योगेश ढोमसे, देवीदास आहेर, विजय धाकराव, देवा पाटील, गोरख ढगे, प्रशांत वैद्य, किशोर क्षत्रिय, महेश खंदारे, वर्धमान पांडे, संजय पाडवी, कैलास गुंजाळ, रूपेश पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कांदा कापणी यंत्र तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक
येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले कांदा कापणी यंत्र बघितल्यावर मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आज विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील नोकरीस पसंती देत आहेत. अशा विद्यार्थ्यांचा देशासाठी काहीच फायदा होत नाही. चांदवडच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत त्या शिक्षणाचा शेतकऱ्यांसाठी सदुपयोग केल्याने मनस्वी समाधान वाटत असल्याचे सांगताना अनासपुरे यांचे डोळे भरून आले होते.

हेही वाचा:

Back to top button