नाशिक : शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव, ट्रॉलीसाठी तब्बल 5000 रुपये | पुढारी

नाशिक : शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव, ट्रॉलीसाठी तब्बल 5000 रुपये

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा
शेतीतील उत्पादन वाढण्यासाठी शेणखत महत्त्वाचे आहे. मात्र पशुधनांची संख्या घटल्यामुळे शेणखत मिळणे अवघड झाले आहे. शेणखताला सोन्याचा भाव आला असून, एक टॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी 5000 ते 6000 रुपये मोजावे लागत आहेत.

शेतकरी खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतातील आंतरमशागतीच्या कामात व्यस्त दिसत आहे. सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात शेणखत टाकण्याचे काम सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव डुकरा, शेणीत, बेलू परिसरात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतेले जाते. मोठ्या शेतजमिनीचा पोत वाढण्यासाठी शेणखतासारखे खत नाही. त्यामुळे शेतीतील उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी शेणखताला महत्त्व देतात. मात्र पशुधनांची संख्या घटल्यामुळे शेणखत मिळणे अवघड झाले आहे. शेणखताला जोरदार भाव आला असून, एक टॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी 5000 ते 6000 रुपये मोजावे लागत आहेत. यंदा शेणखताचा दर खूपच वाढला आहे. अलीकडे शेतकर्‍यांकडील पशुधन कमी झाल्याने ही समस्या निर्माण होत आहे. पैसे देऊनही चांगले शेणखत मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. अनेक शेतकरी शेणखत मिळत नसल्यामुळे अन्य पर्यायांचा वापर करतात. त्यामध्ये कोंबडीखत, लेंडीखत तसेच साखर कारखान्यातील मळी टाकण्यात येते. मळीमुळे उत्पन्नात वाढ होत असली तरी नंतर शेतजमीन खराब होते. त्यामुळे शेणखताला सर्वाधिक शेतकर्‍यांची पसंती आहे. शेतकर्‍यांकडे सध्या जनावरांची संख्या अल्प प्रमाणात आहे. परंतु अनेक मजुरांकडे जनावरांची संख्या असून, ते दुधाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करतात. शेतकर्‍यांच्या शेतामध्येच जनावर नेतात आणि शेतकर्‍यांना शेणखताची विक्री करून चांगला पैसा कमवत आहे. पूर्वी एखादे जनावर असले तरीही त्याचे शेण वर्षभर उकंड्यामध्ये जमा करून ठेवण्यात येत होते आणि उन्हाळ्यात ते शेतात टाकले जात होते. आता स्वतंत्र शेणखतच एकत्रित ठेवले जाते आणि जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरची ट्रॉली भरून शेतात नेऊन टाकले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button