नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तोटा कमी करण्यासाठी उत्पन्नवाढीच्या उपाययोजना सिटीलिंकने हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सिटीलिंकच्या बसेसमधून पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाणार असून, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर एजन्सी नियुक्तीकरिता निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सिटीलिंकची बससेवा नाशिककरांसाठी वरदान ठरत असली तरी महापालिकेला मात्र या बससेवेतून तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी सिटीलिंकने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिटीलिंकच्या बसथांब्यांवर जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, त्यात अपेक्षित यश आलेले नाही. आता उत्पन्नवाढीसाठी पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय सिटीलिंकने घेतला आहे. सिटीलिंकच्या बसेस पिंपळगाव, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीपर्यंत धावतात. त्यामुळे या भागात पार्सल सेवा सुरू केली जाणार असून, त्याचे दर ठरवण्याचे काम सुरू आहे. या पार्सल सेवेकरिता स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आचारसंहितेनंतरच या निविदा प्रक्रियेला मुहूर्त लाभू शकणार आहे.
अतिरिक्त सामानासाठी तिकीट
महसूलवृद्धीसाठी प्रवाशांकडील २० किलोपेक्षा अधिक वजनाच्या सामानाकरिता स्वतंत्र तिकीट काढण्याची योजना सिटीलिंकने सुरू केली आहे. शहरात या योजनेला तूर्त फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी भविष्यकालीन विचार करता ही योजना फायदेशीर ठरेल, असा विश्वास सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एसटीच्या धर्तीवर पार्सल सेवा सुरू करण्यासह तिकिटावर जाहिरातींना परवानगी देण्याचा प्रस्ताव सिटीलिंक संचालक मंडळाने मंजूर केला आहे. त्यासंदर्भातील नियमावली तयार केली जात असून, आचारसंहितेनंतर पार्सल सेवेकरिता एजन्सी नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. – बाजीराव माळी, महाव्यवस्थापक, सिटीलिंक
हेही वाचा –