नाशिक : विद्यार्थ्यांना मिळणार आठ हजार विद्यावेतन | पुढारी

नाशिक : विद्यार्थ्यांना मिळणार आठ हजार विद्यावेतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील कुणबी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी अभिनव योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी)मार्फत कुणबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एसबीआय आणि आयबीआय अंतर्गत होणार्‍या बँकिंग परीक्षांची तयारी करण्याकरिता मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या कुणबी व मराठा विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. या प्रशिक्षण वर्गाकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची सामायिक परीक्षा होईल. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सारथीने निवडलेल्या शैक्षणिक संस्थांच्या वतीने चार महिने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दरमहा रुपये आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे.

अर्जासाठी 31 मेपर्यंत मुदत
विद्यार्थ्यांना www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर (website) 31 मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘सारथी’च्या वतीने करण्यात आले आहे.

अशी आहेत कागदपत्रे
(मराठा) : शाळा सोडल्याचा दाखला, पदवी प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट साइज फोटो.
(कुणबी) : शाळा सोडल्याचा दाखला, पदवी प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट साइज फोटो.

इथे मिळेल प्रशिक्षण
‘सारथी’ने राज्यभरातील आठ शैक्षणिक संस्थांची निवड केली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या संस्थांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिकमधील बीके एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीची ‘सारथी’ने निवड केली आहे. अर्ज प्रक्रिया वा अन्य माहितीकरिता विद्यार्थी बीके करिअर अकॅडमी, गजानन प्लाझा, घारपुरे घाट रोड, अशोक स्तंभ, नाशिक येथे संपर्क करू शकतात.

हेही वाचा:

Back to top button