सांगलीत आज मध्यान्ह वेळी 12.28 ला शून्य सावली | पुढारी

सांगलीत आज मध्यान्ह वेळी 12.28 ला शून्य सावली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येत्या सात मे रोजी मध्यान्ह वेळी 12.28 ला सांगली परिसरात शून्य सावली आविष्कार अनुभवायला मिळेल. विद्यार्थ्यांना या भू-खगोलीय आविष्काराचा प्रयोगाद्वारे अनुभव घेता येईल.

आपली पृथ्वी तिच्या सूर्याभोवतालच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 23.4 अंशांनी कललेली असल्यामुळे आपण पृथ्वीवासीय सूर्याचे दक्षिणायन- उत्तरायण अनुभवत असतो. म्हणजेच सहा महिने सूर्य दक्षिण गोलार्धात 23.4 अंशावरील विष्टंभ बिंदूपर्यंत मकर वृत्तापर्यंत सरकताना दिसतो. तर, सहा महिने तो उत्तर गोलार्धात 23.4 अंशावरील कर्क वृत्तापर्यंत सरकताना दिसतो. यालाच आपण सूर्याचे दक्षिणायन-उत्तरायण असे म्हणतो. या दक्षिणायन- उत्तरायणामुळे पृथ्वीवरती ऋतचक्र अनुभवत असतो. तसेच मकरवृत्त आणि कर्कवृत्ता दरम्यानच्या भूप्रदेशावर वर्षातून दोनवेळा सूर्य मध्यान्ह वेळी बरोब्बर माथ्यावर येत असतो. एरवी तो दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे सरकलेला दिसतो. सांगली शहराच्या माथ्यावर सूर्य वर्षातील दोन वेळा 7 मे व 5 ऑगस्ट रोजी येत असतो, त्यामुळे या दोन दिवशी तेथील लंबरूप वस्तूंच्या सावल्या मध्यान्ह वेळी त्यांच्या पायात पडतात आणि दिसेनाश्या होतात, गायब होतात. हा अविष्कार काही मिनिटेच अनुभवता येतो, की जेव्हा सूर्य त्या स्थानाच्या बरोब्बर माथ्यावर असतो आणि ही वेळ असते मध्यान्ह वेळ. आज बरोब्बर 12.28 ला सूर्य सांगली शहराच्या माथ्यावर तळपणार आहे आणि सांगली परिसरातील सर्व लंबरूप वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायामध्ये पडून नष्ट झालेल्या, शून्यवत झालेल्या आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.

विद्यार्थी हा अविष्कार प्रयोग करुन पाहू शकणार आहेत. त्यासाठी सूर्यप्रकाशात वेगवेगळ्या वस्तू एखाद्या सपाट पृष्ठभागावर, मैदानावर लंबरुप उभ्या करून त्यांच्या सावल्या गायब झाल्याचा अनुभव घेऊ शकतात.

Back to top button