नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका | पुढारी

नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बारसू रिफायनरीच्या कामात राजकारण आणले जात आहे. वास्तविक, सन २०२२ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उत्तम असल्याचे सुचविले होते. मात्र राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर त्यांच्याकडून लाेकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. बारसू रिफायनरीवरून ठाकरे दुटप्पी राजकारण करत असल्याची टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

नाशिक दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री ना. सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. कोकणाचा विकास होत असताना जाणीवपूर्वक राजकारण आणले जात आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर ठाकरेंनी रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण योग्य असल्याचे पंतप्रधानांना सांगितले होते. ते मुख्यमंत्री राहिले असते तर हा प्रकल्प केव्हाच पुढे सरकरला असता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने ठाकरेंचा बारसू प्रकल्पाला विरोध असल्याचा आरोप ना. सामंत यांनी केला. बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या माती परीक्षण केले जात आहे. प्रकल्प करण्यासाठी जागा योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रकल्प करायचा की नाही हे ठरविले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी नाटे परिसरात बोअर मारून झाले आहेत. सर्वेक्षणाला 65 टक्के लोकांनी समर्थन दिले आहे. मात्र, राजकारणासाठी गैरसमज पसरवून वातावरण खराब केले जात आहे. आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर करण्याची सर्व पक्षांची जबाबदारी आहे, असे ना. सामंत यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमधील पांजरापोळच्या जागेसंदर्भात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर औद्योगिक वसाहतीसाठी जागा द्यायची की नाही ? याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी श्वेतपत्रिका काढणार
उद्योग बाहेर गेले म्हणून ओरडणारेच आता उद्योग येत असताना विरोध का करतात? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. पत्रकार परिषद घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात वेदांता फॉक्सकॉनसह ज्या-ज्या विषयावर आरोप झाले, त्याचे स्पष्टीकरण देणारी श्वेत पत्रिका काढणार असल्याचेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Back to top button