नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार | पुढारी

नाशिक : शहर झपाट्याने वाढतय, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर झपाट्याने वाढत असल्याने, शहर स्वच्छतेसाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहराच्या स्वच्छतेसाठी सुमारे ७०० कंत्राटी स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, ही संख्या अपुरी पडत असल्याने नव्या करारात त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दि. ३१ जुलैपर्यंत करार संपत असल्याने, नव्या करारासाठी प्राथमिक अहवाल तयार करण्याची तयारी केली जात आहे.

मध्यंतरी स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत नसल्याने मनसेकडून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसह राज्य कर्मचारी विमा योजनेचे पैसे भरले जात नसल्याचे समोर आले होते. विशेष बाब म्हणजे पैसे भरल्याच्या नोंदी महापालिका प्रशासनाकडून तपासल्या जातात. अशातही ठेकेदारांकडून धूर्तपणे महापालिका प्रशासनाला खोट्या नोंदी दाखविल्या जात असल्याची शंका लोकप्रतिनिधींनी वारंवार उपस्थित केली हाेती. या पार्श्वभूमीवर नवीन कराराच्या मसुद्यामध्ये कायद्याची विशेष कलमे टाकण्याबाबत प्रशासनाकडून विचार केला जात आहे. दरम्यान, आगामी तीन वर्षे कराराचा मसुदा येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत तयार करून अतिरिक्त आयुक्तांसमवेत बैठक घेऊन निश्चित करावयाचा आहे. त्या दृष्टीने सध्या प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

शहर झपाट्याने वाढत असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबतचा विचार सुरू आहे. सध्या कराराचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, अतिरिक्त आयुक्तांसमवेतच्या बैठकीत त्यावर चर्चा केली जाईल. त्यानंतर निविदा काढून ठेका देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

– कल्पना कुटे, संचालक, घनकचरा संकलन व व्यवस्थापन विभाग

हेही वाचा : 

Back to top button