पुणे : उन्हामुळे अंगणवाड्या लवकर सोडा : मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद | पुढारी

पुणे : उन्हामुळे अंगणवाड्या लवकर सोडा : मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद

पुणे : उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे जिल्हा परिषदेकडून अंगणवाडीतील बालकांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अंगणवाड्या या साडेबाराऐवजी सकाळी साडेअकरा वाजताच सोडण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अंगणवाड्यांची एकूण संख्या 4 हजार 384 असून 3 लाख 12 हजार बालक अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सध्या जिल्ह्यात बहुतांश शाळांना सुट्या लागल्या आहेत. मात्र, गावातील अंगणवाड्या सुरू आहेत.

उष्माघाताची लक्षणे…
उष्माघाताचा धोका लक्षात घेता अंगणवाडीत आलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. जे बालक आहार घेण्यास नकार देत असेल, चिडचिड करणे, लघवी कमी करणे, तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे, डोळ्यातून अश्रू न येणे, आकडी येणे, रक्तस्राव होणे, अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ पालकांना सांगून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.

बालकांसाठी उष्माघात प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना…
बालकांना स्वच्छ व गरम ताजा आहारच द्यावा श्र अंगणवाडीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, हवा खेळती ठेवा, फॅन लावावा
बालकांनी पुरेसे पाणी प्यावे, यासाठी दर एक तासाने पाणी पिण्याची बेल द्यावी श्र शुद्ध आणि स्वच्छ गार पाणी फिल्टरमध्ये ठेवावे
अंगणवाडीत ओआरएस उपलब्ध ठेवावे, मेडिकल किटही असावे
अंगणवाडीतून बालकांना घेऊन जाताना पालकांनी छत्री/टोपी/रुमाल घेऊन यावे श्र दुपारी बारा ते तीन या वेळेत बालकांना घरात थांबवावे

सेविका आणि मदतनीससाठी…
गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडी केंद्रात न बोलावता प्राधान्याने गृहभेटी द्याव्यात. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गृहभेटी व सर्व्हे करताना स्वतःची उष्माघातापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी. अंगणवाडी क्षेत्रात कार्यरत आशासेविका यांच्या संपर्कात राहावे.

Back to top button