नाशिक : लखमापूर ॲस्टोन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे…उत्पादन तूर्तास बंद!! | पुढारी

नाशिक : लखमापूर ॲस्टोन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे...उत्पादन तूर्तास बंद!!

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

लखमापूर औद्योगिक वसाहतीतील ॲस्टोन पेपरमिलच्या बॉयलरमधून निघणारा धूर आणि अती उग्रवासामुळे होणाऱ्या प्रदूषणाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टाळे ठोकत उत्पादन तूर्तास बंद केले आहे.

याविषयी ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, मागील सात-आठ महिन्यांपूर्वी ग्रामस्थांची विशेष ग्रामसभेत २५ ऑगस्ट २०२२ रोजी चर्चा झाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने ७ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीला नोटीस देऊन कळविले. त्यानंतर ८  सप्टेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. त्यानंतरही कंपनीने काहीही उपाययोजना केलेल्या नाही. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत ११ एप्रिलला सर्वांनी प्रत्यक्ष पेपरमिलवर जात तेथील परिस्थितीत सुधारणा करावी, अशी नोटीस ग्रामपंचायत कार्यालयामार्फत देण्यात आली. त्यानंतर सरपंच संगीता देशमुख, उपसरपंच किशोर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी कंपनीला टाळे ठोकले.

कंपनीला बजावण्यात आलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, कंपनी बॉयलर पेटविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवाप्रदूषण होते. त्यातून परिसरात पसरणारा दुर्गंधीयुक्त वास व काजळीच्या प्रदूषणामु‌ळे परिसरातील शेती धोक्यात आली आहे. बॉयलर पेटविण्यासाठी प्लास्टिकचा इंधन म्हणून वापर पूर्णतः थांबवावा. कंपनीलगत असलेल्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. या तक्रारींवर कंपनीने तातडीने उपाययोजना करावी. या सर्व प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत कंपनीने आपले उत्पादन तूर्तास बंद ठेवावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले. कंपनी गावच्या पश्चिमेला असल्याने बॉयलरमधून निघणारे धुराचे काळे लोट गावात पसरत असल्याने दूरवरच्या शेतपिकांची नासाडी होत आहे. अती उग्रवासाने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे सरपंच-उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीनिशी निघालेल्या या नोटिशीव्दारे कंपनीचे उत्पादन तूर्तास बंद करण्यात आले आहे. या नोटिशीच्या प्रती जिल्हाधिकारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड नाशिक, दिंडोरीचे गटविकास अधिकार, तहसीलदार, वणीचे सहायक पोलिस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

Back to top button