नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीसह दोघे ताब्यात | पुढारी

नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीसह दोघे ताब्यात

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे पत्नीनेच प्रियकरासह एकाच्या मदतीने लाडूद येथे असलेल्या पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत संशयित पत्नीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

जायखेडा येथे शुक्रवारी सकाळी अमरधाममागे नदीकाठावर अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आला होता. मृताच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असता, काही वेळाने मृताची ओळख पटविण्यात यश आले. मृताचे नाव दत्तात्रेय (पिंट्या) राजाराम ठाकरे (४०) असून तो लाडूद येथील असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. मृताच्या पत्नीकडे विचारपूस केली असता संबंधित गुन्ह्यात तिचे दोन साथीदार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. मृताची पत्नी, तिचा प्रियकर व त्याचा साथीदार यांनी प्रेमसंबंधातून कटकारस्थान रचून खून केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ तपास करीत असून सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव काळे, पोलिस हवालदार सुनील पाटील, गोपीनाथ भोये, राजेश सावळे, पोलिस नाईक योगेश क्षीरसागर, उमेश भदाणे, शरद भगरे, पोलिस कॉन्स्टेबल अरविंद ढवळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा आदींनी या तपासात विशेष कामगिरी बजावली.

हेही वाचा :

Back to top button