बेदाण्याच्या व्यवहारात शेतकर्‍यांची कुचेष्टा | पुढारी

बेदाण्याच्या व्यवहारात शेतकर्‍यांची कुचेष्टा

सोलापूर : संतोष सिरसट सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे द्राक्षाला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल बेदाणा तयार करण्याकडे आहे. तयार झालेला बेदाणा पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेल्यानंतर त्या ठिकाणचे व्यापारी बेदाण्याच्या पासिंगच्या नावाखाली शेतकर्‍यांची कुचेष्टा करून त्यांना मानसिक त्रास देत असल्याची बाब समोर आली आहे.

सांगली – तासगावच्या खालोखाल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याचे सौदे मोठ्या प्रमाणात होतात. बेदाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते.

मात्र, बाजार समिती प्रशासनाची शेतकर्‍यांच्या बाबतीतची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या बेदाण्याचे सौदे हे दर मंगळवारी दुपारी एक वाजता सुरू होतात. त्या सौद्यात बेदाण्याचा लिलाव झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या शेतकर्‍याचा माल ज्या व्यापार्‍याने तो घेतला आहे, तो व्यापारी माल नेण्यापूर्वी त्याचे पासिंग करण्यासाठी येतो. लिलावामध्ये शेतकर्‍याने ठेवलेले बेदाण्याचे सॅम्पल व प्रत्यक्षात आणलेला बेदाणा याची तुलनात्मक प्रतवारी व्यापारी पाहतात. ती प्रतवारी योग्य नसल्याच्या कारणावरून माल नाकारण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोणत्याही किरकोळ कारणावरून शेतकर्‍यांचा माल नाकारला जात आहे.

अत्याधुनिक नेटिंग मशिनचा उपयोग

बेदाणा तयार करण्यासाठी अत्याधुनिक नेटिंग मशिनचा उपयोग केला जातो. बेदाण्याचा रंग वेगळा असला, तरी तो बेदाणा सेन्सरच्या साह्याने बाजूला काढण्याचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. त्या ठिकाणचा माल शेतकरी सॅम्पल म्हणून सौद्यासाठी आणतो. असे असतानाही सॅम्पल पासिंग न करण्याची भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे. ही भूमिका शेतकर्‍यांवर अन्याय करणारी असल्याचे मत बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांमधून व्यक्त केले जात आहे.

पणनचा कायदा धाब्यावर

पणन विभागाच्या कायद्यानुसार एखाद्या मालाचा सौदा झाल्यानंतर तो माल कोणत्याही स्थितीत नाकारता येत नाही. मात्र, पणन विभागाचा हा कायदा धाब्यावर बसवत पंढरपूर बाजार समितीमध्ये पासिंगच्या नावाखाली शेतकर्‍यांचा माल नाकारला जात आहे. त्यामुळे संबंधित व्यापार्‍याकडून शेतकर्‍यांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार होत आहे. या सगळ्या प्रकाराकडे बाजार समिती मात्र पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे मागील काही दिवसांपासून समोर येत आहे.

Back to top button