नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा | पुढारी

नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झालेला जाणवत आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी संपात सहभागी असल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त आहे. रुग्णसेवेत कोठेही खंड पडू नये, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा १२ तासांची केली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये नियुक्त केले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुरळीत होण्यास मदत होत आहे.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. रविवारी (दि. १९) संपाला सहा दिवस होऊनही त्यावर तोडगा निघालेला नसल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, या संपात सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग तीनमधील परिचारिका, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, लिपिक तसेच वर्ग चारमधील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेवर परिणाम झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना आठ तासांऐवजी १२ तासांची ड्युटी करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रमांतर्गत नेमलेल्या कंत्राटी ३०० कर्मचाऱ्यांनाही जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेमले आहे. अनुभवी कंत्राटी परिचारिकांची नियुक्ती अतिदक्षता विभागांसह बालविभागात केली आहे. दरम्यान, संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार जिल्हा रुग्णालयामार्फत नोटिसा बजाविल्या आहेत. यातील काही कर्मचारी हजर झाले आहेत. परंतु हे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही जिल्हा आरोग्य यंत्रणेत सहभागी केल्याने ताण कमी होण्यास मदत होत आहे. – डॉ. अनंत पवार, विभागीय आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा:

 

Back to top button