सिंधुदुर्ग : आता होणार भव्यदिव्य सिंधु महोत्सव! | पुढारी

सिंधुदुर्ग : आता होणार भव्यदिव्य सिंधु महोत्सव!

कुडाळ; पुढारी वुत्तसेवा : महानाट्य शिवगर्जनाला दुसर्‍या दिवशीही हजारोंची उपस्थिती होती. ही उपस्थिती पाहता सन 2023- 24 मध्ये नभूतो न भविष्यती असा सिंधु महोत्सव आयोजित केला जाईल, असे विशाल सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवा उद्योजक विशाल परब यांनी जाहीर केले.

भाजप नेते नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खास लोकाग्रहास्तव आयोजित ’शिवगर्जना’ या महानाट्याला दुसर्‍या दिवशी ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. 17 मार्च रोजी नीलेश राणे यांच्या वाढदिनी म्हणजे महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी, गोवा येथील शिवप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शनिवार 18 रोजी झालेल्या दुसर्‍या प्रयोगास सुमारे 30 हजाराहुन अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली.आशिया खंडातील सर्वात मोठे ’शिवगर्जना’ हे महानाट्य येथील नागरिकांना पाहण्याची संधी देणारे भाजप युवानेते विशाल परब यांनी शनिवारी नागरिकांशी स्टेजवरून संवाद साधला. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत श्री परब यांनी मनपूर्वक आभार मानले.

या महानाट्य स्थळी विशाल परब यांच्या पत्नी सौ.वेदिका परब या सुद्धा उपस्थित होत्या. श्री परब, सौ. वेदिका परब आणि चिरंजीव आणि सुकन्येसह शस्त्रपूजन, अश्वपूजन आणि गजपूजन करून आशीर्वाद घेतले.छत्रपतींचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण तो नव्या स्वरूपात सादर करून कोल्हापूरच्या ’यादव’ यांनी कोकणातील जनतेला वेगळी अनुभूती दिली. याचे श्रेय जाते ते भाजपचे युवानेते विशाल परब यांना. आज बर्‍याच वर्षांनी कोकणातील जनतेला माहित असलेली पण सुधारित नाट्यकलाकृती पाहायला मिळाली. ’शिवगर्जना’ महानाट्य म्हणजे छत्रपतींचा 300 वर्षांपूर्वीचा जाज्वल्य इतिहास होय. हा इतिहास आजच्या मोबाईल दुनियेतील युवा वर्गाला समजणे गरजेचे असून त्या दृष्टीने युवा नेते विशाल परब यांनी ही संकल्पना तयार करून सिंधुदुर्गनगरीत महानाट्य सादर करायचे अशी भूमिका घेतली.

Back to top button