नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : देश-विदेशातील पक्षी अभ्यासकांचे आवडते ठिकाण | पुढारी

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : देश-विदेशातील पक्षी अभ्यासकांचे आवडते ठिकाण

दीपक श्रीवास्तव, नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा 

दरवर्षी हिमालय आणि हिमालयाच्या उत्तरेकडून उत्तर गोलार्धातील वाढत्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रचंड संख्येने लहान-मोठे पक्षी दक्षिण गोलार्धाकडे झेपावतात. साधारणपणे ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत त्यांचा मुक्काम हा उबदार प्रदेशामध्ये असतो. अशा या स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी हजारो पक्षी हे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या परिसरामध्ये दाखल होत असतात. यंदाही देशी-विदेशी पक्षांचे आगमन सुरू झाल्याने अभयारण्यातील पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

गोदावरी नदीवर सुमारे 115 वर्षांपूर्वी नांदूर मध्यमेश्वर धरणाची निर्मिती करण्यात आलेली होती. काळाच्या ओघात या धरणामध्ये प्रचंड स्वरूपात गाळ साचून धरणाची साठवण क्षमता खूप कमी झाली. धरणाच्या भिंतीला अडलेले पाणी म्हणजेच बॅकवॉटर हे खूप मोठ्या परिसरात पसरलेले असून या बॅक वॉटर ला जास्त खोली नसल्यामुळे या ठिकाणी झाडी-झुडपे, गवत, शेवाळ आणि इतर पान वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. मासे, बेडूक, खेकडे, गोगलगायी, शंख शिंपले आणि अन्य जलचर व कीटक यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पक्ष्यांना मुबलक अन्न, पाणी, निवारा उपलब्ध होतो.

विख्यात पक्षी तज्ञ डॉक्टर सालीम अली यांनी 1980 च्या दशकात या स्थळाला स्वतः भेट दिलेली होती. या ठिकाणाचे पक्षी वैभव बघितल्यानंतर नांदूर मध्यमेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे भरतपूरच आहे, असे उस्फुर्त उद्गार त्यांनी काढले. गेल्याच वर्षी या परिसराला जागतिक स्तरावरील रामसर दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. जगभरातील महत्त्वपूर्ण पानस्थळांमध्ये या परिसराचा समावेश झाल्याने देश विदेशातील पर्यटकांचे व पक्षी अभ्यासकांचे हे आवडते ठिकाण बनलेले आहे.

220 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी

220 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी या ठिकाणी आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मणी बदक, स्पॉट बिल डक, ओपन बिल स्टार्क, रंगीत करकोचा, जांभळा बगळा, जांभळी पानकोंबडी, दलदल ससाणा, राखी बगळा, नकटे बदक, थापट्या, गर्गणी, टिटवी, गरुड, किंगफिशर कापशी घार, हनी बी इटर, खाटीक, परीट, कोतवाल, नाचन, टर्न, लालसरी रेड क्रेस्टेड पोचार्ड, पाणबुडी, हळदीकुंकू, कुदळया अशा अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा समावेश होतो.

नांदूरमध्यमेश्वरला येणारे विदेशी पाहुणे

फ्लेमिंगो- भारत-पाक सीमेवरील कच्छचे आखात

सामान्य क्रौंच- सायबेरिया व मध्य आशिया

करकरा क्रौंच- मंगोलिया व मध्य आशिया

युरेशियन कोरल- मध्य युरोप व पश्चिम आशिया

तलवार बदक- रशिया व मध्य आशिया

बाकचोच तुतारी- उत्तर आशिया

चिखली तुतारी- युरोप

थापट्या बदक- युरोप व आशिया

गोरली (सुलोही)- बलुचिस्तान

ब्लिथरचा बोरू- पाकिस्तान

हिरवट वटवट्या- पाकिस्तान

करड्या मानेचा भारीट- बलुचिस्तान

सर्व फोटो सौजन्य :  रोशन पोटे

ठिकठिकाणी पक्षी मनोरे, निवासाची सुविधा

या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना व पक्षी अभ्यासकांना महाराष्ट्राच्या वन्यजीव विभागाने बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पक्षी निरीक्षण करणे सुलभ व्हावे यासाठी ठीक ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले असून चांगल्या दर्जाच्या दुर्बीण, प्रशिक्षित मार्गदर्शक, निवासाची सुविधा, चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था, पक्षी संग्रहालय, बगीचा पार्किंग, मार्गदर्शक फलक, स्वच्छतागृहांची व्यवस्था अशा अनेक गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अभयारण्याच्या लगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी प्रवेश मोफत असून अन्य पर्यटकांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने व वन विभागाच्या वतीने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.

वन्य जीव विभागाची जबाबदारी सध्या उपवनसंरक्षक शशांक हिरे, सहाय्यक उपवनसंरक्षक विक्रम अहिरे, वनक्षेत्रपाल शेखर देवकर, वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक संदीप काळे आणि आशा वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.

अभयारण्याला भेट देण्यासाठी

या अभयारण्याला भेट देण्यासाठी सिन्नर, नाशिक, निफाड अशा तीनही ठिकाणाहून वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. मध्य रेल्वेवरील नाशिक आणि निफाड ही रेल्वे स्थानके जवळ असून ओझर येथील विमानतळ देखील येथून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे.


सर्व फोटो सौजन्य :  रोशन पोटे


हेही वाचा :

Back to top button