सोमेश्वरनगर : बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क | पुढारी

सोमेश्वरनगर : बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क

सोमेश्वरनगर (ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : वाघळवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अमित रामचंद्र शिंदे या उच्चशिक्षित नवरदेवाने लग्नाला जाण्याअगोदर मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. अमित व मरीआईचीवाडी-लोणंद (ता. खंडाळा) येथील स्वाती भिकोबा यादव यांचा नियोजित विवाह रविवार(दि. 18) सायंकाळी समता पॅलेस येथे पार पडला. लग्नाची धावपळ सुरू असतानाही अमित याने लोकशाहीसाठी महत्त्वाचा असलेला मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पाडले. त्यामुळे परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

एकीकडे वेळ असूनही मतदानाला दांडी मारणार्‍यांची संख्या जास्त असताना अमित याने मतदानाचा हक्क बजावत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. बारामतीच्या पश्चिम भागातील वाघळवाडी, वाणेवाडी, मुरुम, गडदरवाडी, सोरटेवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचारासाठी उडालेली धावपळ थांबल्याने आता मंगळवारी जाहीर होणार्‍या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक राजकीय पदाधिकार्‍यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असून, ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाचे वर्चस्व सिद्ध होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button