नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – डॉ. भारती पवार | पुढारी

नाशिकच्या विमानसेवेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार - डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या उडान योजनेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने तसेच व्यावसायिक उड्डाणास नाशिकमधून प्रतिसादाअभावी अलायन्स एअरलाइन्सने त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. स्पाइस जेटची नाशिकमधून, हैदराबाद, दिल्ली आणि पुद्दुचेरी-तिरूपती (कनेक्टिव्ह) सेवा कायम असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. उड्डाणांतर्गत नाशिकमधून नियमित विमानसेवेसाठी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नाशिकमधून उडान योजनेंंतर्गत विमानसेवा खंडित झाली आहे. सर्वच स्तरांतून रोष व्यक्त केला जात असताना ना. पवार यांनी शुक्रवारी (दि. 4) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. केंद्राने उडान योजना राबविताना तीन वर्षांचा कालावधी ठरवून दिला आहे. त्यानुसार अलायन्स एअरलाइन्सला नाशिकमधून सेवा देताना जानेवारीत त्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही कंपनीने आतापर्यंत सेवा सुरू ठेवली. पण, व्यावसायिक उड्डाणासाठी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने कंपनीने नाशिक-पुणे तसेच हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद-दिल्ली सेवा बंद केली. तसेच स्पाइस जेटची नाशिक-दिल्ली सेवा कायम असून, त्याची मुदत पुढील वर्षापर्यंत असल्याचे त्यांनी स्पष्ट करताना राजकीय दबावातून अन्य राज्यांत विमान पळवून नेल्याचा इन्कार केला.

नाशिकमध्ये विमानसेवेला मिळणारा प्रतिसाद बघता उडानमधून त्यांना मुदतवाढ मिळावी, यासाठी केंद्रीय नागरी विमानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती ना. पवार यांनी दिली. नाशिकमधून गोवा, कोलकाता, भोपाळच्या विमानसेवेसाठी इंडिगो कंपनीशी संपर्कात असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, नाफेड चौकशीबाबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती ना. पवार यांनी दिली.

रेल्वेबाबत फेरसर्वेक्षण
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पात वेगमर्यादा आणि अनेक तांत्रिक अडचणी आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अडचणी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात महारेल व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेत तांत्रिक अडचणी दूर करत नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. नव्याने प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला जाईल, अशी माहिती ना. डॉ. भारती पवार यांनी दिली. तसेच हा प्रकल्प रद्द झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button