नगर : ग्रामसेवक पतसंस्थेची निवडणूक रद्द करा ! कर्जत तालुक्यातील ग्रामसेवक मतदारांनी दिला उपोषणाचा इशारा | पुढारी

नगर : ग्रामसेवक पतसंस्थेची निवडणूक रद्द करा ! कर्जत तालुक्यातील ग्रामसेवक मतदारांनी दिला उपोषणाचा इशारा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सहकार विभागाने सुचविलेल्या ठिकाणी होणे अपेक्षित असतानाही, ती सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संस्थेच्या कार्यालयात घेतली. आपल्या मर्जीतील उमेदवारांचे अर्ज स्वीकृत केले, त्यामुळे याप्रकरणी चौकशी होवून निवडणूक रद्द करावी, अन्यथा 14 नोव्हेंबरपासून सहकार विभागासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कर्जत तालुक्यातील ग्रामसेवक मतदारांनी दिला आहे.

पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम दि.25 ऑक्टोबरपासून सुरु झालेला होता. हा कार्यक्रम सहकार विभागाने दिलेल्या निवडणूक कार्यालयात झालेला नसून अर्ज दाखल करणे, अर्जाची छाननी करणे इ. कार्यक्रम ग्रामसेवक पतसंस्थेच्या कार्यालयात झाला. त्यामुळे उपनिबंधक यांनी याप्रकरणी चौकशी करून सहाय्यक निवडणूक अधिकारी पठाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहाय्यक निवडणूक अधिकारी हे पतसंस्थेतील कर्मचारी असल्याने त्यांनी जाणून बुजून स्वतःच्या मर्जीतले उमेदवारांचे अर्ज घेतले. उमेदवार विकास हजारे हे छाननी दिवशी दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून निवडणूक कार्यालयात हजर होते. मात्र कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. कार्यालयातील छाननी दिवशीचे फुटेज पाहू शकता. तरी सदर निवडणूक प्रक्रियेचे आपण चौकशी करुन सदर निवडणूक प्रक्रिया पूर्णतः रद्द करुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, विकास हजारे, अंकुश वेताळ, कांतीलाल मानशिकारे, विठ्ठल बरबडे, विठ्ठल कवळे, महेश जगताप, सचिन मोकाशी, विकास सामसे, शिवाजी धांडे आदींच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन उपनिबंधक गणेश पुरी यांना देण्यात आले आहे.

Back to top button