जळगाव : ’शिंदे गटाच्या आमदाराचे राष्ट्रवादीशी आय लव्ह यू’
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील आमदारांमध्ये चढाओढ सुरू असून, एकमेकांविरुद्ध टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, तरीही हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आ. चिमणरावांच्या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री गुलाबरावांनी आता पलटवार केला असून, राष्ट्रवादीशी सेटलमेंट केल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादीच्या आमदाराला ना. गुलाबराव पाटील यांनी पाणी योजनांसाठी निधी दिल्याने आमदार चिमणराव पाटील हे नाराज आहेत. चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलासोबत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव दिसल्याने चिमणराव पाटलांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच पुन्हा चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली असून, सध्या या दोघांमधील वाद विकोपाला गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून चिमणराव पाटील यांनी टीका केल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी या टिकेचा समाचार घेतला आहे. एकमेकांबरोबर नारळ फोडल्याने जर पक्षाला बळ मिळत असेल, तर पारोळा मार्केट कमिटीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उमेदवारांना चिमणराव पाटील बिनविरोध निवडून आणतात. राष्ट्रवादीशी आय लव्ह यू करतात. तेव्हा त्यांचे बळ कुठे जाते? असा आरोप ना. गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
विकासासाठी तर शरद पवार, आशिष शेलारही एकत्र आले
चिमणराव पाटील यांना मीच शिवसेनेत आणले. माझ्या जुन्या मतदारसंघात ते आमदार झाले. त्यावेळी त्यांना घेऊन मी मतदारसंघात फिरलो. तेव्हा मात्र कधीही आमच्यात कटुता नव्हती. चिमणरावांच्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मंजूर केल्या आहेत. ते परस्पर त्या योजनांचे उद्घाटन करतात. पत्रिकेवर माझे नावही टाकत नाही. प्रोटोकॉलनुसार योजना मंजूर झाल्यास त्या खात्याच्या मंत्र्याचे नाव पत्रिकेत टाकावे, मात्र याबाबत मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. मी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, राजकारणात मोठे मन ठेवावे लागते. काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर, शरद पवार, आशिष शेलार सगळे नेते एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे पक्ष कुठलाही असो विकासकामे करताना एकत्र येण्यास काही हरकत नाही, असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.