नोकर्‍या देण्यात संरक्षण मंत्रालय आघाडीवर; अमेरिकन लष्कर दुसर्‍या स्थानी | पुढारी

नोकर्‍या देण्यात संरक्षण मंत्रालय आघाडीवर; अमेरिकन लष्कर दुसर्‍या स्थानी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : नोकर्‍या देण्यात भारताचे संरक्षण मंत्रालय जगात सर्वात आघाडीवर आहे. या मंत्रालयाने 29 लाख 20 हजार लोकांना नोकर्‍या देऊन जगातील सर्वात मोठा ‘एम्प्लॉयर’ होण्याचा दर्जा मिळविला आहे. या मंत्रालयात काम करणार्‍यांमध्ये सैनिक, राखीव कर्मचारी आणि नागरी कर्मचारी यांचा समावेश आहे. ‘स्टॅटिस्टा’ या जर्मनीस्थित खासगी संस्थेच्या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या संस्थेमार्फत जगभरातील अनेक विषयांबाबतची आकडेवारी आणि इतर माहिती पुरविली जात असते.

स्टॅटिस्टा इन्फोग्राफिकनुसार, 2022 मध्ये जगभरातील सर्वात जास्त कर्मचारी संख्या असलेल्या यादीत भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर अमेरिकेचा संरक्षण विभाग आहे. या विभागात 29 लाख 10 हजार लोक नोकरीवर आहेत. चीनमध्ये, पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये 25 लाख लोकांना नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. यात नागरी पदांचा समावेश नाही.

अमेरिकन संरक्षण खात्याच्या चिनी समतुल्य, सेंट्रल मिलिटरी कमिशनमध्ये जवळपास 68 लाख लोक नोकरीत असू शकतात. तरीही या यादीत समाविष्ट करण्यासाठी हा आकडा पुरेसा विश्वासार्ह मानला जात नाही, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, जगातील कोणत्याही कंपनीपेक्षा वॉलमार्टमध्ये जास्त कर्मचारी आहेत. अमेरिकेच्या रिटेल क्षेत्रातील या दिग्गज कंपनीकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, हा आकडा 23 लाख इतका आहे. अ‍ॅमेझॉन या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे; पण त्यांच्याकडे असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या वॉलमार्टच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे 16 लाख आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) च्या अहवालानुसार, 2021 मध्ये लष्करी खर्चात सर्वात जास्त खर्च करणारे अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशिया हे 5 देश होते. त्यांचा एकत्रित खर्च एकूण खर्चाच्या 62 टक्के होता. 2021 मध्ये अमेरिकेचा लष्करी खर्च 801 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा खर्च करणार्‍या चीनने त्याच्या लष्करासाठी अंदाजे 293 अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. भारताचा हा खर्च 76.6 अब्ज अमेरिकन डॉलरचा असून, जगात हा तिसरा सर्वोच्च खर्च आहे.

Back to top button