नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका | पुढारी

नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा
यंदा पावसाने चांगला कहर माजवला असून, दीपावली सणासुदीला सुरुवात झाली असतानाही पर्जन्यवृष्टी थांबण्याची चिन्हे नाहीत. त्याचा खरीप पिकांसह डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

चालू हंगामात डाळिंबाला परदेशातून मागणी वाढल्याने बाजारभावसुद्धा वधारले आहेत. डाळिंबाचा सरासरी भाव शंभरपासून दोनशे रुपये प्रतिकिलो झाला आहे. मात्र, या बागांना अतिवृष्टीमुळे खूपच नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. डाळिंब पीक ऐन मोसममध्ये आले असताना दररोजच पाऊस होत आहे. पावसामुळे डाळिंबाची गुणवत्ता खालावत आहे. परिणामी, उत्पादन खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता धूसर आहे. महागडी खते, औषधफवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने डाळिंब उत्पादक हतबल झाला आहे. दुसरीकडे शासनपातळीवरून पंचनामे होत नाहीत. तेव्हा पिकविमा काढलेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होतो. डाळिंब उत्पादकांना न्याय देण्याची मागणी माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केली आहे.

कोठरे परिसरातही ढगफुटीसद़ृश पाऊस…
मालेगाव : राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. मालेगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावून जात आहे. तालुक्याच्या काटवन भागात असलेल्या कोठरे गाव परिसरात सोमवारी ढगफुटीसद़ृश पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. कांद्याची रोपे वाहून गेली. या अतिवृष्टीने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा:

Back to top button