शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले.. | पुढारी

शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
वेळेत पडत नाही, पडला तर इतका पडला की, सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता हातातोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने शेतकर्‍याने करायचे काय ? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा, रब्बी हंगामातील पिकांची लागवड करायची कशी, बियाणे, औषधे विकत घ्यायचे कसे ? आमचा तुटलेला संसार पुन्हा उभा करायचा कसा ? अशा एक ना अनेक चिंतेने झोप उडालीये ‘दादा’..! आता मायबाप सरकारनेच आर्थिक मदत देऊन आमचा उद्धार करण्याची आर्त हाक चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे केली आहे.

चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील शेतपिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या मका, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, उडीद, भाजीपाला पिकांमध्ये कंबरेइतके पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडली आहेत. या पिकांचे एक टक्काही उत्पन्न निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील छोट्या-मोठ्या नद्यांनी उच्छाद मांडल्याने रस्ते, पूल वाहून गेले आहेत. यामुळे काही वाड्या-वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. पाऊस उघडून तीन दिवस उलटूनदेखील नद्यांमधील पुराचे पाणी ओसरत नसल्याने वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांशी संपर्क करता येत नाही. दहीवद येथील खलवाडी येथील निंबाळकर वस्तीवर 300 ते 350 घरे आहेत. येथील रहिवाशांचा अन् गावाच्या मधून वाहणार्‍या गोई नदीला प्रचंड पूर आला आहे. या पुरात गावकर्‍यांनी बनविलेला कच्चा पूल वाहून गेल्याने 6 दिवसांपासून या वस्तीवरील रहिवाशांचा गावाशी संपर्क तुटला आहे. या परिस्थितीची पाहणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शासकीय अधिकार्‍यांसह केली. यावेळी या गोई नदीवर पूल बांधणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी सरपंच दीपाली निंबाळकर, गणेश निंबाळकर यांनी आमदार आहेरांकडे केली. गोई नदीचे पात्र मोठे असल्याने या ठिकाणी पूल बांधण्यासाठी खर्च जास्त येणार असल्याने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून पूल मंजूर करून देण्याचे आश्वासन आमदार आहेरांनी दहीवदकरांना दिले. तसेच येथील दिव्यांग सोमनाथ निंबाळकर यांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने अपंग शेष निधीतून नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन निंबाळकर यांना दिले.

तळेगावरोही गटात पाहणी: चांदवड तालुक्यातील तळेगावरोही जिल्हा परिषद गटातील हिवरखेडे, दिघवद, दहीवद, काजीसांगवी, सोनीसांगवी, रेडगाव, वाहेगावसाळ, काळखोडे, तळेगावरोही आदी गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, महेश पाटील, आदी उपस्थित होते.

चांदवड तालुक्यातील चार महसूल मंडळांत मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत तत्काळ मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. – डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड-देवळा मतदारसंघ.

हेही वाचा:

Back to top button