खासदार संजय राऊत नाशिक पोलिस आयुक्तांच्या भेटीला | पुढारी

खासदार संजय राऊत नाशिक पोलिस आयुक्तांच्या भेटीला

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक सिंधुदुर्ग येथे पाठविण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरात नाशिक पोलिस प्रकाशझोतात आले होते. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांवर टीकेची झोड उठविली होती. तसेच अटकेसाठी सरकारकडून पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर करीत असल्याचा आरोपही केला होता.

मात्र, पोलिस आयुक्त पाण्डे्य यांनी कारवाईचे समर्थन करताना आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले होते.

या पोलिस आयुक्तांच्या या ठाम भूमिकेबद्दल ते चांगलेच प्रकाशझोतात आले होते.

दरम्यान, हे सर्व प्रकरण ताजे असतानाच खासदार संजय राऊत यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याने वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे.

या भेटीविषयी राऊत यांना विचारले असता, ‘नाशिकचे पोलिस आयुक्तांना मी आता नव्हे तर बऱ्याच काळापासून ओळखतो. त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळीदेखील पोलीस खात्यात आहे.

आमचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. ते प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी आहेत. अशा अधिकाऱ्यांना भेटणे मला आवडते.’ असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘त्या’ दोघांना मी पाठीशी घातले नाही

भाजप कार्यालयावर दगडफेक प्रकरणी पोलिसांना हवे असलेले नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविकेचे पती बाळा दराडे खासदार संजय राऊत यांच्यासोबत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर शिवसेना गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची टीका केली गेली. याविषयी राऊत यांनी सांगितले की, ‘मी खासदार आहे. मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोडत नाही. मी त्या दोघांना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही.

Back to top button