Nashik : गौळाणेत बिबट्याचे दर्शन; कुत्र्याच्या शिकारीचा प्रयत्न | पुढारी

Nashik : गौळाणेत बिबट्याचे दर्शन; कुत्र्याच्या शिकारीचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर मनपा हद्दीचे शेवटचे टोक असलेल्या गौळाणे गावात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. यावेळी बिबट्याने कुत्र्याला जखमी केले आहे. वनविभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केली.

गौळाणे गावातील शांताराम चुंभळे यांच्या बंगल्यात रविवारी (दि. 26) मध्यरात्रीनंतर बिबट्याने प्रवेश केला. त्याने बंगल्यातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत जखमी केले. या आवाजाने चुंभळे परिवार जागे झाले आणि खिडकीतून बाहेर पाहिले असता, बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी जोरजोरात खिडकीचे दरवाजे वाजवताच बिबट्याने बंगल्याबाहेर उडी घेत पलायन केले. बिबट्याचा बंगल्यातील वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

आज वनविभागाच्या पथकाने गावात जाऊन पाहणी केली. नागरिकांनी घाबरू नये व सतर्कता बाळगावी. तसेच रात्री उशिरा एकट्याने बाहेर फिरू नये, असे आवाहन वनाधिकारी विवेक भदाणे यांनी केले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उभारावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे व कैलास चुंभळे यांनी केली आहे. दरम्यान वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. तर जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार केले.

हेही वाचा :

Back to top button