जळगाव : रावेर तालुक्यात वादळासह पावसाची हजेरी, तिसऱ्यांदा केळीला फटका! | पुढारी

जळगाव : रावेर तालुक्यात वादळासह पावसाची हजेरी, तिसऱ्यांदा केळीला फटका!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यात वादळासह पावसाने हजेरी लावली. गेल्या ११ दिवसांत सलग तीनवेळा वादळाचा तडाखा बसल्याने केळीचे पीक मातीमोल झाले आहे. प्रामुख्याने पूनखेडा, पातोंडी, खिरवड व विटवा या गावांच्या शिवारातील केळीचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने रावेर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

रावेर तालुक्यात ३१ मे रोजी अहिरवाडी परिसरातील गावांना, तर ८ जूनला धामोडी, कांडवेल परिसराला वादळासह पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसला होता. त्यानंतर शनिवारी ११ जूनला रात्रीच्या सुमारास पूनखेडा, पातोंडी, खिरवड व विटवा परिसराला वादळाने तडाखा दिला. त्यात नारायण धनगर, भगवान बोरसे, विलास बोरसे, जगन्नाथ बोरसे, समाधान पाचपोळे, लक्ष्मण सावळे, स्वप्नील सावळे, अशोक गाबा पाटील, हरीश पाटील, डॉ.गुलाबराव पाटील, विनोद पाटील, हिंमतराव पाटील, विजय पाटील, बिजलाल लवंगे, पंकज मधुकर सपकाळे यांच्यासह अनेकांच्या केळीबागांचे मोठे नुकसान झाले.

घरांवरील पत्रे उडाल्याने नुकसान

रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, स्टेशन रोड या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यात केळीचे नुकसान झाले. स्टेशन रोड शिवारात भागवत पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वादळामुळे पुनखेडा-पातोंडी रस्ता दरम्यानच्या परिसरात झाडे उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला. काहींच्या घरावरील पत्रे उडाली. स्टेशन रोड रावेर शिवारातील पोल व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. पुनखेडा येथे हायमास्ट पोल उन्मळून पडला.

न्हावी येथे १३ घरांचे नुकसान

यावल तालुक्यातील न्हावी येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अण्णाभाऊ साठे नगरातील ८० ते ९० वर्षांपूर्वीचे झाड उन्मळून पडले. त्यात आजूबाजूच्या १२ ते १३ घरांचे नुकसान झाले. तलाठी ए.एस.महाजन यांनी या नुकसानीचे पंचनामे केले. त्यात सुमारे अडीच ते तीन लाखांपर्यंत नुकसान झाल्याचे समोर आले.

हेही वाचा

Back to top button