Dhananjay Mahadik : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्रेक होईल : धनंजय महाडिक | पुढारी

Dhananjay Mahadik : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्रेक होईल : धनंजय महाडिक

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेली खदखद राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर आली आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा उद्रेक झालेला पाहायला मिळेल, असा इशारा भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आज (दि.१२) येथे पत्रकार बैठकीत दिला. भाजप पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात कमळ चिन्ह फुलवू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर धनंजय महाडिक  (Dhananjay Mahadik) यांचा पेठनाका येथे जाहीर सत्कार करण्यात आला. स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सी. बी. पाटील, युवा मोर्चाचे सचिव जयराज पाटील, स्वरुपराव पाटील, सतीश महाडिक, प्राचार्य महेश जोशी आदी उपस्थित होते.

या वेळी धनंजय महाडिक म्हणाले, भाजप पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिली, हेच मी माझे भाग्य समजतो. उमेदवारी जाहीर झाली तेंव्हाच मला विजयाची खात्री होती. आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची रणनीती तसेच महाडिक कुटुंबीय व कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे हा विजय मिळाला. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सार्थ ठरवून दाखवू.

ते म्हणाले, भ्रष्टाचार, टक्केवारी यामुळे महाविकास आघाडी सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. आघाडीत खदखद सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही खदखद बाहेर आली आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा उद्रेक झालेला पाहायला मिळेल . संभाजीराजेंची या निवडणुकीत भूमिका वेगळी होती. त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नसावी, असे सांगून ते म्हणाले, “संभाजीराजेंचे वय कमी आहे, त्यांचे संघटन मोठे आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात चांगली संधी मिळू शकते.”

हेही वाचलंत का ? 

Back to top button