नाशिक : अनैतिक संबंधातून मेहुणीचा खुन | पुढारी

नाशिक : अनैतिक संबंधातून मेहुणीचा खुन

इगतपुरी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत पहाटे ३ वाजण्याच्या सुमाराला २४ वर्षीय युवतीची अनैतिक संबधातून खुन केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे फिर्यादीच आरोपी निघाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आरोपीने फिर्यादीत माझ्या मेहुणीचा जमावाकडून खुन करण्यात आला आहे असे सांगितले. तसेच ३ कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकली, १० ते २० जणांच्या टोळक्यांनी ही घटना घडवली. शिवाय मला सोडवायला येणाऱ्या मेहुणीवर वर्मी घाव घालण्यात आला व त्यात तिचा जागीच मृत्यू झालेचे फिर्यादीमध्ये म्हटले होते. मात्र पोलिसांना आरोपीचा संशय आल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी खुन केल्याचा गुन्हा कबुल केला. याबाबत आरोपीच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अधरवड येथील तारीचा मोडा येथील कातकरी वस्तीत राहणारा शरद महादु वाघ व मेव्हणी लक्ष्मीबाई  पवार (वय २४ वर्ष, रा. बिरूळे, ता. नांदगाव)  यांचे अनैतिक संबध होते. लक्ष्मीबाई पवार ही शरद वाघ याला सारखा लग्नाचा तगादा लावत होती. शुक्रवारी पहाटे पुन्हा लक्ष्मीबाईने लग्नाचा तगादा लावत वाद घातला. आत्ताच लग्न कर नाही तर तुझे घर पेटवून देईन अशी धमकी दिली. या दोघांचा वाद विकोपाला गेल्यावर लक्ष्मीबाईने शरद वाघ याचे घर पेटवून दिले. घर पेटवल्याचा राग अनावर झाल्याने शरद वाघने घरातल्या कोयत्याने लक्ष्मीबाई पवारच्या गळ्यावर वार करून  तिला ठार मारले.

याबाबत शरद वाघची बायको सविता शरद वाघ (वय २७, रा. अधरवड) हिने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी शरद वाघ याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले,  शिवाजी जुदंरे आदी करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button