नाशिक : मुलीचा ताबा मिळावा यासाठी आईचे उपोषण | पुढारी

नाशिक : मुलीचा ताबा मिळावा यासाठी आईचे उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहादा तालुक्यातील माता आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या भेटीसाठी व्याकूळ झाली आहे. पतीने बळजबरीने मातेच्या कुशीमधून मुलीला हिसकावून नेले आहे. त्यानंतर शहाद्याच्या कौटुंबिक न्यायालयाने मुलीचा ताबा आईला द्यावा, असे निर्देश 10 मार्च रोजी देऊनही पतीने अद्यापही तिचा ताबा दिलेला नाही. पोलिस व संबंधित यंत्रणाही त्यात लक्ष घालत नसल्याने या मातेने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मुलीचा ताबा मिळावा यासाठी जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन दिले.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार मखमलाबाद रोेडवरील उदयनगर येथील रहिवासी सुवर्णा भाऊराव बागूल सध्या अमृतधाम, पंचवटी येथे वास्तव्यास आहेत. पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने नंदुरबार येथे माहेर गाठले. पण, तेथे पतीने येऊन मुलीला हिसकावून घेत तिला नाशिकला आणले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून मुलीच्या भेटीसाठी माता व्याकूळ झाली आहे. मुलीचा तात्पुरता ताबा मिळवण्यासाठी मी जिल्हा न्यायालय शहादा येथे घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत अर्ज केला. न्यायालयाने 10 मार्च 2022 रोजी माझा अर्ज स्वीकारला आणि स्थानिक पोलिस आणि संरक्षण अधिकार्‍यांना आवश्यक कारवाईचे आणि माझ्या मुलीचा ताबा माझ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले. पण, अजूनही माझे पती व त्यांच्या कुटुंबाने मुलगी राही हिचा ताबा आपल्याकडे दिला नसल्याचे पीडित आईचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Back to top button