सांगली : नगरसेवक आक्रमक; महापौरही भडकले | पुढारी

सांगली : नगरसेवक आक्रमक; महापौरही भडकले

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : नगरसेवक निधीतील अनेक कामे तीन-चार वर्षांपासून रखडल्यावरून मंगळवारी महापालिकेतील बैठकीत खडाजंगी झाली. प्रलंबित कामांवरून नगरसेवक आक्रमक झाले. महापौरही प्रशासनावर भडकले. कामांच्या फाईल प्रलंबित राहण्यास जबाबदार असणारे कर्मचारी, अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करा, कार्यादेश मिळूनही काम सुरू न करणार्‍या, काम पूर्ण न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले.

महापालिकेच्या वसंतदादा सभागृहात बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता संजय देसाई, नगरसचिव चंद्रकांत आडके तसेच नगरसेवक उपस्थित होते.

सन 2018-19 पासून नगरसेवक निधीतील मंजूर अनेक कामे रखडली आहेत. काही कामे निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. काही कामांचे कार्यारंभ आदेश रखडले. कार्यारंभ आदेश होऊनही काही कामे सुरूच झाली नाहीत. गेल्या चार वर्षांपासून अनेक कामे रखडली असल्यावरून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. सर्वच नगरसेवक आक्रमक झाले होते.

फाईल गायब, दप्तर दिरंगाई

आढावा बैठक असतानाही प्रभागनिहाय, कामनिहाय माहिती बांधकाम विभागााकडे नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कामांच्या फाईल कोणत्या विभागात, कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहे, हेही व्यवस्थितपणे सांगता येत नसल्यावरून नगरसेवक आक्रमक झाले. बांधकाम, ऑडिट, लेखा विभागात फाईलचा वेळेत निपटारा होत नसल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी केल्या. फाईल गायब होत असल्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

8.44 कोटींची कामे ‘समाजकल्याण’च्या परस्पर

समाजकल्याण समितीच्या परस्पर 8.44 कोटींच्या कामांच्या मंजुरीवरून सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, योगेंद्र थोरात, आनंदा देवमाने यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बराच वाद आणि गोंधळ घातला. दरम्यान याप्रकरणी प्रशासनाने खुलासा सादर करावा, असे निर्देश महापौर सूर्यवंशी यांनी दिले. सूर्यवंशी म्हणाले, अनेक कामे प्रलंबित आहेत. ठेकेदार ‘बिलो’मध्ये जाऊन कामे घेतात, पण पूर्ण करत नाहीत. कार्यादेश देऊन काम सुरू करत नाहीत, त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठेकेदार दहा-वीस-पंचवीस कामे घेतात. पण कामे करत नाहीत. जुनी कामे रखडली असतील तर नवीन कामांच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही, अशाप्रकारे निविदेत अट समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांच्या फाईल मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.

माजी नगरसेवकाची शिफारस; सभागृह नेते संतापले; शाखा अभियंत्याची स्वाक्षरी बोगस मिरज येथील प्रभाग समिती क्रमांक 4 कडील रस्ता मुरुमीकरण, खडीकरणाचे काम एका माजी नगरसेवकांच्या शिफारशीने आले आहे. विद्यमान नगरसेवकांचे पाच लाखांचे काम मंजूर होत नसताना माजी नगरसेवकांचे 15 लाखांचे काम मंजुरीला कसे आले, असा प्रश्न सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी उपस्थित केला. या प्रस्तावातील टिपणीत शाखा अभियंत्यांची स्वाक्षरी बोगस असल्याचा प्रकारही समोर आला. याप्रकरणी चौकशी व कारवाईचे आदेश देण्यात आले.

शहर अभियंत्यांवर महापौर वैतागले

रखडलेल्या कामांवरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी निर्देश देत असताना शहर अभियंते संजय देसाई मत व्यक्त करत होते. त्यावरून देसाई यांच्यावर सूर्यवंशी वैतागले. बैठक सोडून निघून जाऊ लागले. अन्य पदाधिकार्‍यांनी त्यांना रोखले व बैठक पुढे सुरू झाली.

Back to top button