नाशिक : सलग दुसर्‍या दिवशी कोम्बिंग; शहरात पोलिसांकडून 186 जणांवर कारवाई | पुढारी

नाशिक : सलग दुसर्‍या दिवशी कोम्बिंग; शहरात पोलिसांकडून 186 जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी सलग दुसर्‍या दिवशी रात्रभर पायी पेट्रोलिंग, कोम्बिंग ऑपरेशन, टवाळखोरांवर कारवाईसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम राबवली. यात परिमंडळ एकमधील सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 186 जणांवर कारवाई करण्यात आली.

शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचे प्रयत्न, हाणामारीसह चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे घडत आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत असून, त्यात पोलिस ठाणेनिहाय पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमध्ये एक अधिकारी व सात अंमलदार असून, ते पोलिस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी पायी गस्त घालत असतात. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम, धरपकड करण्यासोबतच टवाळखोरांवरही कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि.4) रात्रभर 200 हून अधिक कारवाई केल्यानंतर रविवारी (दि.5) रात्री पुन्हा विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यात अवैध दारू विक्री प्रकरणी एक, अवैध हत्यार बाळगणार्‍याविरोधात एक, 38 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली, हिस्ट्रीशीटर 20 गुन्हेगारांची तपासणी केली. त्याचप्रमाणे तडीपार केलेल्या 35 गुंडांची तपासणी केली. 83 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. तर वेळेत दुकाने बंद न करणार्‍या सात व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयास्पद फिरणार्‍या एकाविरोधात मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button