नाशिक : निर्‍हाळे येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू | पुढारी

नाशिक : निर्‍हाळे येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील निर्‍हाळे येथे विहिरीत पाय घसरून 21 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. कांचन उत्तम थोरात (21) असे या युवतीचे नाव आहे.

निर्‍हाळे येथील उत्तम रावजी थोरात यांनी या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. ते शेती व्यवसाय करून कुटुंबासह वस्तीवर राहतात. ते सकाळी निमोण येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी गेले होते, तर त्यांची पत्नी व मुलगा सिन्नर येथे कामासाठी गेले होते. घरी कांचन व मुलगा ओमकार होते. कांचन 12 वाजेपूर्वी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेली होती. विहिरीत पाणी पडत नसल्याने ती विहिरीत डोकावण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाय घसरून ती विहिरीत पडल्याची खबर वावी पोलिस ठाण्यात देण्यात आली. शेजारच्या नागरिकांनी तातडीने तिला विहिरीतून काढून दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी सिन्नरला पाठवण्यात आले. तथापि, तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते अधिक तपास करीत आहेत.

Back to top button