काचेच्या प्रतिमेत शिवराज्याभिषेक सोहळा; ‘भारत वर्ल्ड रेकॉर्ड’कडून दखल | पुढारी

काचेच्या प्रतिमेत शिवराज्याभिषेक सोहळा; ‘भारत वर्ल्ड रेकॉर्ड’कडून दखल

सुनील जगताप

पुणे : स्टेन्ड ग्लास माध्यमातून काचेच्या प्रतिमा घडवण्याचे काम करणार्‍या राहुल लोहकरे या कलाकाराने चक्क शिवराज्याभिषेकाचा सोहळा साकारला आहे. या कलाकृतीची भारत वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ वर्ल्ड या दोन संस्थांनी दखल घेतली असून, लवकरच त्यांचा सन्मानही केला जाणार आहे.

गेल्या 20 वर्षांपासून कलाकृती करणार्‍या राहुल लोकरे विविध काच प्रतिमा करण्याची कलाकृती साकारत असून, आत्तापर्यंत 125 प्रतिमा त्यांनी तयार केल्या आहेत. ‘शिवराज्याभिषेक’ ही त्यांची पूर्ण होणारी 100 वी काच प्रतिमा असून, याच काच प्रतिमेची दाखल भारत वर्ल्ड बुकने घेतली आहे. पारदर्शक आणि अपारदर्शक अशा दोन्ही प्रकारच्या काचा वापरून शिवराज्यभिषेक सोहळ्याची काच प्रतिमा तयार केली आहे. याबाबत दै. पुढारीशी बोलताना लोहकरे म्हणाले, की हे फक्त काचेवरील पेंटिंग नाही.

‘पुणे प्लॉगेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 34 हजार किलो कचरा संकलित

विविध रंगी आणि विविध पोत असलेल्या इंपोर्टेड काचा वापरून या माध्यमातून प्रतिमा निर्मिती केली जाते. हे काम हाताने काचा कापून केले जाते. सर्व कापलेल्या काचांना आधी कॉपर टेप लावली जाते व नंतर शिसे (लेड) वितळवून त्याने सर्व काचा जोडल्या जातात. त्या प्रतिमेतील चेहरा, दागिने, असे काही भाग पारदर्शक रंग वापरून रंगवले जातात.

पाठीमागून प्रकाशमान होईल अशा फ्रेममध्ये ही प्रतिमा बसवली जाते. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेबाबत लोकरे म्हणाले, की अशाप्रकारे काचा जोडून बनवली गेलेली शिवछत्रपतींची ही आजवरची जगातील पहिलीच काच प्रतिमा आहे. या काच प्रतिमेचा आकार 3 बाय 5 फूट व प्लायवूड बॉक्स फ्रेममसह आकार 4 बाय 6 फूट आहे. या बॉक्समध्ये 8 एलईडी ट्यूबलाईट बसविलेल्या आहेत.

नाशिक : नाशिक देवराई परिसरात बांबूलागवड

यामध्ये केशरी रंगाच्या 2 प्रकारच्या, लाल रंगाच्या 2, पिवळ्या रंगाच्या 2 , निळ्या रंगाच्या 4 , हिरव्या रंगाच्या 2 प्रकारच्या काचा, तसेच गुलाबी रंगाची काच वापरली आहे. पारदर्शक आणि अपारदर्शक अशा दोन्ही प्रकारच्या काचा वापरून शिवराज्यभिषेक सोहळ्याची काच प्रतिमा तयार केली आहे. याच कलाकृतीची दखल घेण्यात आल्याने अतिशय आनंद झाला आहे. या उपक्रमात माझी आई मला साथ देत असते.

Back to top button