नाशिक : ‘पुणतांबा’च्या समर्थनार्थ मुंजवाडला धरणे | पुढारी

नाशिक : ‘पुणतांबा’च्या समर्थनार्थ मुंजवाडला धरणे

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी मुंजवाड ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी बुधवारी (दि.1) धरणे आंदोलन छेडले.

राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा सोडवणुकीसाठी पुणतांबा ग्रामस्थांनी शासनाला इशारा देत बुधवारपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. पुणतांबा ग्रामस्थांनी यासाठी या आधीच ग्रामसभेत ठरावदेखील मंजूर केले आहेत. त्यानुसार मुंजवाडवासीयांनीही विशेष ग्रामसभेचे आयोजन करून पुणतांब्याच्या धर्तीवर 16 ठराव मंजूर केले आहेत. ठरावाची प्रत तहसीलदारांना सादर करण्यात आली असून, त्यानंतर पुणतांबावासीयांनी बुधवारपासून सुरू केलेल्या आंदोलनात थेट सहभागी होत पाठिंबा दर्शविण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे धरले. आगामी पाच दिवस पुणतांबावासीय धरणे धरणार असून, मागण्या मार्गी न लागल्यास आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने मुंजवाडवासीयांकडूनदेखील पुणतांबावासीयांच्या खांद्याला खांदा लावून आगामी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सरपंच प्रमिला साहेबराव पवार, ग्रामविकास अधिकारी सुभाष भामरे, तलाठी गरुड व पोलिसपाटील दीपक सूर्यवंशी यांनी आंदोलनस्थळी येऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. आंदोलनकर्त्यांनी त्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी तरुण शेतकरी श्रीपाद जाधव, केशव सूर्यवंशी, माजी सरपंच गणेश जाधव, नानाजी जाधव, भिका सूर्यवंशी, मिलिंद जाधव, घनश्याम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, उमेश खैरनार, वैभव अहिरे, गोपाळ जाधव, पंडित जाधव, वसंत जाधव, नरेंद्र जाधव, वैभव वाघ, एकनाथ बोरसे, आशिष जाधव, नामदेव बच्छाव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा:

Back to top button