नाशिक : एनडीएसटी सोसायटी सभासदांना 6 टक्के लाभांश : ढोबळे | पुढारी

नाशिक : एनडीएसटी सोसायटी सभासदांना 6 टक्के लाभांश : ढोबळे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
एनडीएसटी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या गोंधळात विषयांना मंजुरी दिली जात होती. या वर्षीच्या सोसायटीच्या सभेत प्रारंभी विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर विरोधक सभेतून बाहेर गेल्यानंतर सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सर्व विषयांना मंजुरी देत सभा तीन तास चालली. सोसायटीच्या वतीने सभासदांना 6 टक्के लाभांश जाहीर केल्याची घोषणा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब ढोबळे यांनी केली. तसेच सोसायटीच्या नांदगाव व देवळा येथे स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नाशिक (एनडीएसटी सोसायटी)ची वार्षिक सर्वसाधारण सभा प. सा. नाट्यगृहात चेअरमन बाळासाहेब ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यवाह भाऊसाहेब शिरसाट, संचालक मोहन चकोर, संजय चव्हाण, रामराव बनकर, संजय देवरे, अरुण पवार, जिभाऊ शिंदे, संजय देसले, दत्तात्रेय आदिक, अण्णासाहेब काटे, विजया पाटील, भारती पवार आदी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अहवाल काळातील दिवंगत सभासद तसेच दिवंगत थोर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालक मोहन चकोर यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन ढोबळे यांनी संस्थेच्या विकासाचा आलेख मांडला. यावेळी साहेबराव कुटे, संग्राम करंजकर यांनी सोसायटीतील नोकर भरती रद्द करावी, लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, अशी मागणी केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ते सभेतून बाहेर पडले. त्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी किरण पगार, नीलेश ठाकूर, सचिन देशमुख, दिगंबर नारायणे, माजी संचालिका विजया पगार, यशवंत ठोके, नवनाथ निकम, राजेंद्र गिते, दिलीप पूरकर, सीमा निकम, वासुदेव बधान, हेमंत पाटील, दत्ता वाघे पाटील यांनी सभेत सहभाग घेतला. चकोर यांनी सूत्रसंचालन केले. आदिक यांनी आभार मानले.

सभेत सभासदांनी सर्व विषयांवर चर्चा करून मान्यता दिली. सोसायटीत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने सभासदांना सेवा देण्यासाठी नोकरभरती मानधनावर केली आहे. – बाळासाहेब ढोबळे, चेअरमन

हेही वाचा:

Back to top button