नाशिक : पाणीप्रश्नी अरुण पांगारकर यांचे बेमुदत उपोषण सुरू | पुढारी

नाशिक : पाणीप्रश्नी अरुण पांगारकर यांचे बेमुदत उपोषण सुरू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी गावातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता तथा शिवचरित्र अभ्यासक अरुण पांगारकर यांनी श्री संत हरिबाबा समाधी मंदिर येथे बुधवार (दि.25) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी (दि.26) उपोषणाचा दुसरा दिवस होता.

पांगरी गावातील पाणीप्रश्नाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. लोकांना पिण्याचे व वापरायचे पाणी विकत घ्यावे लागत असून, त्यासाठी दरमहा तब्बल पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्यांनी पाच हजार रुपये आणायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे. आधीच दुष्काळी भाग, त्यात विजेचा खेळखंडोबा असल्यामुळे हातची पिके जळून गेली, तरीही गावात सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे. दुग्ध व्यवसायावर लोक कसेतरी पोट भरतात. दुधाला भाव नाही, मात्र खाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत पाण्यासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न पांगारकर यांनी विचारला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याच्या योजना राबविल्या. मात्र त्यांना भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे कामे निकृष्ट झाल्याने आज जनतेवर पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. ग्रामस्थांवर ओढवलेला भीषण पाणीप्रश्न कसा दूर होईल, यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करून एक महिन्याच्या आत शासनाने जनतेच्या पाण्याची सोय लावावी, अन्यथा जनहितार्थ बेमुदत उपोषण कायम करून संत हरिबाबांच्या चरणी हा देह समर्पित करण्याचा निर्धार कायम राहील, असा इशारा पांगारकर यांनी दिला आहे. आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा:

Back to top button