नाशिक : वनविभागाकडून काजवा महोत्सवाला नियमांचे कवच, पर्यटकांसाठी नियमावली जारी | पुढारी

नाशिक : वनविभागाकडून काजवा महोत्सवाला नियमांचे कवच, पर्यटकांसाठी नियमावली जारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा काजवा महोत्सव चमचमणार आहे. महोत्सवाची जोरदार तयारी वनविभागाकडून करण्यात आली आहे. हौशी पर्यटकांचा धुडगूस रोखण्यासाठी वनविभागाने खास नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रात्री 10 नंतर पर्यटकांना काजवे बघण्यासाठी वनक्षेत्रात प्रवेश मिळणार नाही. तसेच वृक्षांवर बॅटर्‍या चमकविण्यासह मोबाइल फ्लॅशद्वारे फोटो घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने तब्बल दोन वर्षांनी पर्यटकांना भंडारदर्‍यासह कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात चमचमणार्‍या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी मिळणार आहे. एकट्या भंडारदर्‍यामध्ये महिनाभराच्या महोत्सवात दीड ते दोन लाख पर्यटक भेटी देत असतात. यंदाच्या महोत्सवात नावनोंदणीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने महोत्सवाला नियमांचे बंधन घातले आहे.

हौशी पर्यटकांकडून वनक्षेत्रात फिरताना काजव्यांना टिपण्यासाठी वृक्षांवर कॅमेर्‍यांचे फ्लॅश अथवा बॅटर्‍यांचा वापर केला जातो. खासगी टुरिस्ट संस्थांकडून वनक्षेत्रात जेवणासह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. पर्यटकांच्या धुडगुसामुळे जैवविविधता धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत महोत्सवावर बंदी घालण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे. काजवा महोत्सवातून स्थानिकांचे फिरणारे अर्थचक्र लक्षात घेऊन वनविभागाने बंदीऐवजी नियमावली जाहीर केली आहे.

दरम्यान, काजवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यासह परिसरातील 17 संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची बैठक पार पडली आहे. बैठकीत पर्यटकांचे व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्था तसेच संयोजकांवर जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. महोत्सवासाठी इतर जिल्ह्यांमधून येणार्‍या पर्यटकांचे नियोजनही केले जात आहे.

वनव्यवस्थापन समित्यांच्या बैठकीतील निर्णय
पर्यटकांचा वावर भागांसाठी स्वतंत्र नियमावली, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना पाच हजार रुपये दंड, पर्यटकांमुळे वनक्षेत्रात होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभाग, महोत्सव संयोजक आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्र काम करणार, पर्यटकांना गाडीने वनक्षेत्रात जाण्यास मनाई, सुटीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे.

हेही वाचा :

Back to top button