आश्रमात सापडले दीडशे वर्षांपूर्वीचे तूप | पुढारी

आश्रमात सापडले दीडशे वर्षांपूर्वीचे तूप

जयपूर : भारतीय संस्कृतीत पंचगव्याला मोठेच महत्त्व आहे आणि आधुनिक काळातही ते कमी झालेले नसून उलट वाढलेलेच आहे. गायीच्या तुपाला तर आजही औषधी महत्त्व आहे. जुन्या काळात तूप साठवून ठेवण्याची विशिष्ट पद्धत होती. राजस्थानमध्ये झुनझुनमधील एका आश्रमात तर आता असे साठवून ठेवलेले तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचे तूप सापडले आहे. इतक्या वर्षांनंतरही या तुपाचा ताजेपणा व सुगंध कायम आहे हे विशेष!

एका कलशात हे तूप साठवलेले आहे. झुनझुनू मुख्यालयापासून चुरू रोडवर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर टांई गावात मन्नानाथ पंथियांचा एक आश्रम आहे. हे गाव बिसाऊच्या जवळ आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या आश्रमाचा इतिहास तब्बल दोन हजार वर्षांचा आहे. सध्याची इमारत दीडशे वर्षांपूर्वीची आहे. या टांई गावातील नाथपंथीय आश्रमाचा जीर्णोद्धार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यावेळी मठाचा कळस काढण्यात आला त्यावेळी त्यामध्ये तुपाने भरलेला हा कलश सापडला. तो सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आला. त्या कलशातील तूप अगदी ताज्या तुपासारखेच दिसत होते व त्याचा सुगंधही कायम होता. आश्रमातील महंत सोमनाथ महाराज यांनी सांगितले की जीर्णोद्धार झाल्यानंतर हा तुपाचा कलश पुन्हा त्याच ठिकाणी ठेवला जाईल. गायीचे तूप बरीच वर्षे टिकते असे ऐकले होते, त्याची आता प्रचिती आली, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button